गुड न्यूज! बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता; यंदाच होणार १०० विद्यार्थ्यांचा प्रवेश! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांच्या प्रयत्नांना यश.
Updated: Oct 1, 2024, 08:41 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथे शासकीय मेडिकल कॉलेजला अखेर केंद्र आणि राज्य सरकारची अंतिम मान्यता मिळाली आहे. यंदाच १०० विद्यार्थ्यांचा प्रथम वर्षासाठी प्रवेश देखील होणार आहे. केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली.👇
बुलडाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी गत अनेक वर्षांपासून होती. ना.प्रतापराव जाधव या विषयासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत होते. केंद्रात आरोग्य मंत्री झाल्यानंतर ना.जाधव यांनी या प्रक्रियेला वेग आणला. स्वतः ना.जाधव ज्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री आहेत त्या मंत्रालयानेच काढलेल्या आदेश पत्रात बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले आहे.👇
बुलडाण्यासह गडचिरोली, वाशिम, भंडारा, जालना, अंबरनाथ व हिंगोली या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांना देखील अंतिम मान्यता मिळाली आहे. बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंदा १०० विद्यार्थ्यांचा प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री ना.जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.