निकृष्ट दर्जाच्या कामाच्या चौकशी च्या आदेशाला पंधरा दिवस उलटुनही कारवाई शुन्य!
नितिन राजपुत यांनी केली होती सां. बा. विभागाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी;ठेकेदार व सां.बा विभागाच्या अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?
Updated: Oct 11, 2024, 09:52 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली तालुक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक रस्ते,सभा मंडप,वॉल कम्पाउंड,गट्टू व इतर कामे करण्यात आली आहे.परंतु यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप नितिन राजपुत यांनी केला होता.याची तक्रार जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता सां. बा. विभाग बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली होती.तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमली परंतु पंधरा दिवस उलटले तरी सुद्धा पथक प्रमुखाने कामाची पाहणी केली नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बांधकाम विभागाच्या समितीने केराची टोपली दाखवल्याचा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवस उलटले तरीसुद्धा कारवाई शुन्य असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा राजपूत यांनी दिला आहे .निकृष्ट काम करणारे ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर कारवाई ची मागणी देखील नितीन राजपूत यांनी केली आहे.
चिखली तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिमेंट कॉक्रेट रस्ते,शेतरस्ते, सभामंडप,पुल,संरक्षण भिंत यासह इतर कामे करण्यात आली आहेत .यामधील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे.यापैकी अनेक कामांच्या तक्रारी गाम्रस्थांकडुन प्राप्त झाल्या आहेत.तर हि कामे अंदाज पत्रका प्रमाणे झाली नाहीत असा आरोप नितीन राजपूत यांनी केला आहे.
तेव्हा गावकऱ्यांनी सां.बा विभागाला कामे निदर्शनास आणून दिली परंतु ठेकेदारांनी या कामामध्ये वारंवार सांगुनही सुधारणा केली नसल्याने नितिन राजपुत यांनी चिखली तालुक्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार २६ जुलै २०२४ रोजी केली होती.तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना अभय मिळत असल्याचे तक्रारीत नमूद करीत संपुर्ण कामांची पाहणी पंचनामे करुन अंदाज पत्रकाप्रमाणे कामे झाली नसल्याने व निकृष्ट झाली असल्याने चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदार व यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ६ ऑगस्ट रोजी रोजी कार्यकारी अभियंता बुलढाणा यांना आदेश दिले होते. त्यानंतर अभियंता यांनी दुसऱ्या दिवशी चौकशी समिती देखील नेमली होती व तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही बाबतचा अहवाल २९ सप्टेंबर पर्यत मागविण्यात आला होता.परंतू या प्रकरणी कुठल्याही कामाचे स्पॉट पाहणी व अंदाजपत्रकांची तपासणी झाली नाही.
चौकशी देखील तक्रारीतील मुद्दान्वये करण्यात आली नाही, अहवाल पाठविण्याचा कालावधी उलटून पंधरा दिवस उलटले तरी सुद्धा कारवाई शुन्य असल्याचे राजपुत यांनी म्हटले असून बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे सुद्धा पालन झाले नसल्याने ठेकेदार व अधिकारी यांना बांधकाम विभागाकडून नेमलेली समिती पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर प्रकरणाची पारदर्शक चौकशी न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजपूत यांनी दिला आहे.
ठेकेदार व सां.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना अभय कुणाचे....?
या प्रकरणी गावामधून अनेक वेळा तक्रारी होतात.उत्रादा येथील निकृष्ट काम चव्हाट्यावर आल्या नंतर ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेत बांधकाम विभागाला वेठीस धरले होते. तेव्हा मात्र ठेकेदारास सा. बा. विभागाने समज देत निकृष्ट काम पाडले गेले, परंतू त्यावेळी कारवाई अपेक्षित असतांना कारवाई काय साधी चौकशी देखील झाली नाही.आता चौकशी समिती काय कारवाई करते याकडे लक्ष लागले असून समितीने अजून पंधरा दिवस उलटून वरीष्ठांना अहवाल सादर केला नसल्याने या ठेकेदार आणि बांधकाम विभागाला अभय कुणाचे? असा सवाल सर्व सामान्य जनता उपस्थित करीत आहे.