शेतकऱ्याचे पत्र सभागृहात वाचून दाखवले!; आ. महाले पाटील म्‍हणाल्या, या शेतकऱ्याला हर्बल गांजाच्या शेतीची परमिशन देणार आहात का?

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सततची नापिकी, गत्‌ दोन वर्षांपासून होणारी अतिवृष्टी यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्याने सरकारकडे हर्बल गांजाचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी पत्र लिहून केली होती. हे पत्र विधानसभेत वाचून दाखवत चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्याच्या या मागणीचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांची बिकट अवस्‍था राज्‍य सरकारला सांगत आ. महाले  पाटील म्हणाल्या, की महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजातला एकही घटक समाधानी नाही. विद्यार्थी, महिला, शेतकरी, बाराबलुतेदार या सर्वांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय सुरू आहे. दोन वर्षे झाली, सतत अतिवृष्टीचा सामना माझा मतदारसंघ करत आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल, कृषी विभागाचे अधिकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. पंचनामे केले. पण कोणतीही मदत जाहीर झाली नाही. शासनाने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं, दोनदा पॅकेज जाहीर केलं. माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक दमडी सुद्धा मदत ही शासनाची मदत मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.

जूनमध्ये ढगफुटीची मदत नाही...
इतकी परिस्थिती वाईट होती माझ्या मतदार संघातील उंद्री जिल्हा परिषद क्षेत्रातील आठ-दहा खेड्यांत ढगफुटी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या गेल्या. विहिरीत पूर्ण गाळ साचला. गुरेढोरे वाहून गेली. परंतु अद्यापपर्यंत एक दमडीसुद्धा मदत शेतकऱ्यांना मदत मिळाले नाही. ही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने कुठलाही निर्णय महाविकास आघाडी सरकार घेत नसल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या धोरणाला कंटाळून बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील मधुकर उत्तमराव शिंगणे या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक एकर हर्बल गांजा पेरण्याची परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री नवाब मलिक यांनीच गांजाला हर्बल म्हटल्याचा दिला दाखला...
यावेळी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी त्या शेतकऱ्याचे पत्र वाचून दाखविले. पत्रात म्हटले, की मी एक शेतकरी असून, अनेक दिवसांपासून भाजीपाला शेती करतो. शेतात कोणतेही पीक घेतले तरी त्याला शासनाचा हमीभाव नसल्याने शेती तोट्यात करावी लागत आहे. शेती मालाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेती पिकाला लावलेला खर्चसुध्दा निघत नाही. परिणामी माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. घर चालविणे कठीण झाले आहे. एवढे पिकवून सुध्दा उपासमारीची पाळी येत आहे. तरी मला एक एकर हर्बल वनस्पती गांजाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या शेतात हर्बल गांजा सापडला व याचे समर्थन देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. मला सुध्दा माझ्यावरील बिकट परीस्थीतीवर मात करण्यासाठी हर्बल गांजा वनस्पतीच बियाणे उपलब्ध करून द्यावे. मला आत्महत्या करायची नाही, मला जगायचे आहे, असे पत्रात म्हटले आहे.

बळीराजाची बिकट अवस्था मांडली सभागृहात...
आ. सौ. श्वेताताई महाले यांनी बळीराजाची बिकट अवस्था सभागृहात मांडताना म्हणाल्या, की किती वाईट अवस्था बळीराजावर आलेली आहे. कर्जमाफी अजून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळाला नाही. शेतकऱ्यांबाबत कोणतेही सकारात्मक धोरण या सरकार जवळ नाही. ज्या बळीराजाने कोविडच्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था सुरू ठेवली त्या बळीराजाला आज गांजाची हर्बल शेती करण्यासाठी  विनंती करावी लागत आहे. सभागृहाच्या माध्यमातून आपणास विचारते की, या शेतकऱ्याला आपण परमिशन देणार आहात का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.