शेतकऱ्यांनो शेतीसोबतच पुरक व्यवसायाचा अवलंब करा! राज्यमंत्री ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचे आवाहन;म्हणाले, कापूस ,सोयाबीन बरोबर "हे" देखील करा..! जिल्ह्यातील विविध गावांना दिल्या भेटी...

 

 बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी कापूस, सोयाबीन, तुर इत्यादी पिकाबरोबरच दूध व्यवसाय, रेशीम उद्योग आणि बांधावरच जैविक खते तयार करून आपल्या कुटुंबास आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले आहे.

 
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा बुलढाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील कृषि, पशुसंवर्धन व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी पुरक व्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन खामगाव आणि मोताळा तालुक्यातील जयपूर येथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातुन ग्रामविकास, वृक्ष लागवड, जलसंवर्धन कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. 
खामगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनोने यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून निमकवळा या गावात कुरण विकास योजनेतंर्गत चारा उत्पादन करून दुग्ध व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा. तसेच इतर गावातील ग्रामपंचायत जागा, गावठाण, गावकुरणे, ई- वर्ग जमिनीवर चारा उत्पादन घेऊन जनावरांची जोपासना करण्यावर भर देण्याबाबत त्यांनी सुचना केल्या. त्यानंतर त्यांनी मोताळा तालुक्यातील मौजे जयपूर गावाला भेट दिली. जयपुर गावांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन मियावाकी प्रकल्प राबविला असून या प्रकल्पांतर्गत त्यांनी डोंगर टेकड्यांवर पडीत जागेवर गाव परिसरामध्ये प्रदूषण कमी करणारी विविध वृक्षांची लागवड केली असून परिसरामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अंतर्गत शेततळे ,पडीत डोंगरउतारावर वृक्षाची लागवड आणि जलसंवर्धन कामे मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे गाव परिसरामध्ये पाणीटंचाई दुर झाली असुन जिवंत पाण्याचे झरे दिसून येत आहे. तसेच श्रमदान, वृक्ष लागवड, दगडी बांध, जलसंवर्धनाचे कामे केल्यामुळे गावामध्ये निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे, हे काम पाहून श्री. हेलोंडे पाटील यांनी समाधान व्यक्त करुन ग्रामस्थाचे अभिनंदन केले. 
 गावकऱ्यांशी चर्चा करत असताना ॲड. हेलोंडे पाटील यांनी शेतकऱ्यांनी केवळ कापूस सोयाबीन सारखे पीक न घेता त्याबरोबरच रोहयोअंतर्गत तुती लागवड करुन रेशीम उद्योग वाढवला पाहिजे.मोकळया पडीत जागा, ग्रामीण भागातील गायरान जागेमध्ये वृक्षाची आणि चारा पिकाची लागवड करून जनावरांना चाराचे उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गावातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी छोट्या-मोठ्या नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बांधावर जैविक खते तयार करून विक्री करावे. आणि त्याचा वापर वाढवला पाहिजे. त्यासाठी कृषि विभागानी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे आणि अनुदानावर जैवीक साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना दिल्या. विदर्भात ज्या गायरान जमिनी आहेत, ग्रामपंचायत मोकळ्या पडीक जमिनी ई वर्ग जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी चारा पिकाची लागवड करून पुढील दोन-तीन वर्षांमध्ये तयार झालेला चारा मोफत घेऊन त्याद्वारे दूध उत्पादनात वाढीस चालना देणे आवश्यक असुन दुधासारखा पूरक व्यवसाय अतिशय महत्त्वाचा असुन कुटुंबात हातभार लावुन कुटुंबाचे जीवनमान उंचावेल. त्याबरोबरच कोरडवाहू क्षेत्र विकास केल्यानंतर गावामध्ये उन्हाळ्यामध्ये जी पाणीटंचाई जाणवते ती या भागामध्ये जाणवणार नाही. एकात्मिक शेती उत्पादन होऊन गावांचा आणि शेतकऱ्यांचा निश्चितच विकास होईल. गावातील ग्रामीण भागातील जनतेने जिथे जिथे नवीन तंत्रज्ञान तयार झालेले त्या भागात जाऊन आत्मसात करुन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
  जयपुर गावातील मियावाकी वृक्ष लागवड व जलसंधारणाचे कामांची पाहणी केली. यावेळी मलकापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष हरीश रावळ, डॉ. तायडे, सरपंच ज्ञानेश्वर गोराडे, उपसरपंच मुन्ना पठाण किशोर नावकर, विक्रम देशमुख तसेच कृषि, महसुल व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.