डॉ. शिंगणे -खा. जाधवांचा हातात हात!

एकत्र येऊन लढणार "ही' निवडणूक!! चिखलीत महाविकास आघाडीची बैठक!
 
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय विरोधक मानले जाणारे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि खासदार प्रतापराव जाधव एकत्र आल्याचे अनोखे चित्र समोर आले आहे. नुसते एकत्रच नाही तर हातात हात घालून मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत निवडणूक लढण्याचा निर्धारही त्‍यांनी केला. राज्‍याप्रमाणेही इथेही काँग्रेसने होकारात होकार मिळवला. त्‍यामुळे आता या दोन्‍ही नगरपंचायतींत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे.

जिल्ह्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या चिखलीनगरीतील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज, २७ नोव्‍हेंबरला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानिमित्त तिन्ही घटक पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख नेते हजर होते. बैठकीत पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, आमदारद्वय संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, बळीराम मापारी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची उपस्‍थिती होती.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारी सारख्या संकटाचा मोठ्या संयम, धीराने सामना करीत नैसर्गिक आपत्तीमध्येही चांगले काम केले. यामुळे वरिष्ठ पातळीप्रमाणे स्थानिक स्तरावरही घटक पक्षांत समन्वय असावा आणि आगामी निवडणुका आघाडीने लढण्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक लावण्यात आली. मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी एकदिलाने उतरून भाजपाला आव्हान देईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व बाजार समित्यांच्या निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित लढविण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. विधान परिषदेची निवडणूकही एकहाती जिंकण्याचा निर्धारही नेत्यांनी व्यक्त केला. याचबरोबर शासनस्तरावरील तालुका व जिल्हास्तरीय समित्या वाटप करण्याच्या बाबतही चर्चा करत निर्णय घेण्यात आले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अकोला-बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्‍य संस्‍था मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या  गोपिकिशन बाजोरिया यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.