चिखलीत आमदार सौ. श्वेताताई महालेंच्‍या नेतृत्वात २५ ऑक्टोबरला आसूड मोर्चा

शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. पिके हातातून गेली आहेत. जमिनी खरडून गेल्या. असे असूनही चिखली तालुक्यात अतिशय कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव रचला गेला, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता आसूड मोर्चा चिखली तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चात सरकारच्या विरोधात खदखदणारा असंतोष हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन व्यक्त करण्याचे आवाहन आमदार सौ. महाले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे.

या आहेत मागण्या...

  • विदर्भातील शेतकऱ्यांना सावत्र वागणूक देणे बंद करून चिखली विधानसभेतील शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २५ हजार, बागायती शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत तात्काळ घोषित करा.
  • आर्थिक मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
  • पीकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम थेट खात्यात जमा करा.
  • कृषी पंपांना दिवसा किमान १० तास वीजपुरवठा करा
  • शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार परत द्यावा.
  • नादुरुस्त ट्रान्सफार्मरची दुरुस्ती तात्काळ २ दिवसांत व्हावी.
  • शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.