रोटी बेटी व्यवहार महत्वाचा! हिंदूंनो जातीपातींना तिलांजली द्या; राणा सोमेश इंगळे यांचे छत्रपती संभाजीनगरात प्रतिपादन
Dec 31, 2024, 12:16 IST
छत्रपती संभाजीनगर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): हिंदू समाजाच्या संघटित शक्तीचे स्वरूप विधानसभा निवडणुकीत दिसले. मात्र केवळ राजकीय शक्ती दिसून चालणार नाही, खऱ्या अर्थाने हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. आपसातील मतभेद, जातीभेद विसरून आपण सर्व हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे. जातीपातींना तिलांजली देऊन हिंदू समाजाने आपसात बेटी व्यवहार सुरू केला तर कुणी जात विचारणार नाही. त्यामुळे हिंदू समाजात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, बेटी व्यवहार सुरू झाला पाहिजे असे प्रतिपादन राणा सोमेश इंगळे यांनी केले. छत्रपती संभाजी नगरात शिवराणा सेवा संघ व मुन्ना राजपूत समाजाच्या वतीने कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते..
आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात राणा सोमेश इंगळे यांनी उपस्थित त्यांची मने जिंकली. धर्मापेक्षा जात मोठी नसते त्यामुळे जातीय अहंकार दूर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. हिंदू समाजातील जाती जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे, त्यामुळे ही चाल ओळखून या षडयंत्राला बळी पडू नका असेही राणा सोमेश इंगळे म्हणाले. यावेळी राणा सोमेश इंगळे यांनी मंत्री अतुल सावे आणि चिखलीचे आमदार श्वेताताई महाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांचे अभिनंदन करीत त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या...