BIG BREAKING आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात? म्हणाले, अजितदादां सोबत नाईलाजाने होतो...

 
Shingne
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना जिल्ह्याच्या राजकारणाला हादरा बसवणारी बातमी समोर येते आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची घरवापशी होण्याची चिन्हे आहेत. स्वतः आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीच तसे संकेत दिले आहेत.वर्धेत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि डॉ.शिंगणे एकाच मंचावर होते. यावेळी डॉ. शिंगणे यांनी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्यासोबत नाईलाजाने होतो असेही विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
  विशेष म्हणजे कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी डॉ.शिंगणे यांना गाठले असता त्यावेळीही डॉ.शिंगणे यांनी त्या विधानाचा पुनरुच्चार केला. शरद पवार यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील, जिल्हा बँकेची पुनर्जीवन व्हावे म्हणून नाईलाजाने मी अजितदादा सोबत होतो, आता सरकारने ३०० कोटींची मदत जिल्हा बँकेला दिली आहे. मात्र शरद पवार साहेबांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील असे विधान डॉ.शिंगणे यांनी केले.
 
"होतो"? याचा अर्थ काय?
वर्धा येथे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शरद पवार आणि डॉ.शिंगणे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात भाषण करताना डॉ.शिंगणे यांनी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी डॉ.शिंगणे यांना गाठले. त्यावेळी मी नाईलाजाने अजित दादांसोबत "होतो"? असे विधान त्यांनी केले. होतो याचा अर्थ आता ते अजित दादांसोबत आहेत की नाहीत? याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही...डॉ.शिंगणे यांच्या विधानाचा काय अर्थ घ्यायचा? यावर राजकीय विश्लेषकांच्या गप्पा झडत आहेत..