बंगळुरूतील घटनेचे जिल्ह्यात पडसाद!
कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची खासदार जाधवांनी केली मागणी
Dec 20, 2021, 07:36 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्नाटकातील बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आगीत तेल टाकणारे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
कर्नाटक सरकारची मराठी माणसावर अन्याय करण्याची भूमिका निषेधार्थ असून, या घटनेचा मी निषेध करताे, असे जाधव यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, बंगळुरूतील घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले असून, जिल्हा शिवसेनेतर्फे बुलडाण्यात बोम्मई यांचा पुतळा जाळण्यात आला. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना संपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. मलकापूरमध्येही शिवसेनेतर्फे नरवेल येथे चौकात शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दुधाचा अभिषेक करण्यात आला. खामगावमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.