Analysis.. कधीकाळी मैत्री आता विरोधात दंड थोपटले!

विधान परिषद निवडणुकीतील मुकाबला ठरणार रोमांचक!!
 
 
विधान परिषद

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १८ वर्षांपासून सलग विधान परिषदेच्या आमदारकीचा अनुभव घेणाऱ्या गोपीकिशन बाजोरियांपुढे यावेळी प्रथमच कडवे आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेना-भाजप सोबत होती, तोपर्यंत हे आव्हान नव्‍हते. पण आता युती राहिली नसल्याने स्वतंत्र उमेदवार भाजपाने दिला आहे. शिवाय जो उमेदवार दिला, तो बाजोरियांना जड जाणारा असल्याने यावेळच्या विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्‍था मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे. बुलडाणा लाइव्हने व्यक्‍त केलेल्या भाकिताप्रमाणे सराफा व्यापारी वसंत खंडेलवाल यांना भाजपाने उमेदवारी देऊन व्यापारी कार्ड खेळले असून, बाजोरियांप्रमाणेच तन, मन अन्‌ धनसंपन्न असलेल्या खंडेलवाल यांना किती मतदारांची पसंती मिळते, हे बघणे औत्‍स्‍युक्‍याचे ठरणार आहे.

एक जानेवारी २०२२ रोजी कार्यकाळ समाप्त होत असलेल्या सहा विधानपरिषद सदस्यांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार १० डिसेंबर रोजी मतदान होऊन १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पक्षाचे नगण्य मतदार असताना शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया इथे सलग तीन टर्म निवडून आले आहेत. यावेळी भाजपाकडून चैनसुख संचेती, योगेंद्र गोडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. खंडेलवाल यांचे पारडे सर्वबाजंूनी जड राहिले आणि उमेदवारीची माळ त्‍यांच्‍या गळ्यात पडली आणि विजयश्री ते खेचून आणतात का, हे पहावे लागणार आहे. यापूर्वी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. युतीचे मतदार आघाडीच्या तुलनेत नगण्य असतानाही बाजोरिया वारंवार चमत्कार करत आले आहेत. मतदारसंघात काँग्रेस -राष्ट्रवादीकडून अन्य उमेदवार इच्छुक नसल्याने बाजोरिया हेच आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवेसना असा रंगतदार मुकाबला या मतदारसंघात होणार आहे.

एकेकाळी व्यावसायिक भागीदार, आता मित्रविरुद्धच रिंगणात
गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी सर्वच दृष्टीने तगडा उमेदवार शोधताना भाजपाने अकोल्यातील प्रसिद्ध उद्योगपती आणि सोन्या- चांदीचे मोठे व्यापारी वसंत खंडेलवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने मतदारांचीही चांदी होणार आहे. वसंत खंडेलवाल हे अकोल्याचे माजी जिल्हा संघचालक शंकरलाल खंडेलवाल यांचे नातू आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या खंडेलवाल ज्वेलर्सचे ते संचालक आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. गडकरींचे ते व्यावसायिक भागीदारही आहेत. काही वर्षांपूर्वी वसंत खडेलवाल आणि गोपीकिशन बाजोरिया यांची अत्यंत जवळीक होती. दोघे व्यावसायिक भागीदारही होते. मात्र नंतरच्या काळात व्यावसायिक वादातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. बाजोरिया यांच्या बाबतीतल्या अनेक बाबी खंडेलवाल यांना माहीत आहेत. बाजोरियांना पराभूत करण्यासाठी वसंत खंडेलवाल कोणतीही कसर ठेवणार नाहीत हे हेरूनच भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. वसंत खंडेलवाल व गोपीकिशन बाजोरिया या दोन तगड्या उमेदवारांमुळे या निवडणुकीत आर्थिक चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका सदस्य व पंचायत समित्यांचे सभापती या निवडणुकीत मतदान करत असतात.
कोणत्या पक्षाचे किती मतदार
भाजप २४४, काँग्रेस १९०, शिवसेना १३०, वंचित बहुजन आघाडी ८५, राष्ट्रवादी काँग्रेस ७६, इतर १७१