बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकात साकारणार फुले दाम्‍पत्‍याचे स्मारक!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकाच्या सौंदर्यात आता भर पडणार असून, क्रांतीसूर्य महात्‍मा ज्‍योतिबा फुले आणि क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती स्मारक या ठिकाणी होणार आहे. १ कोटी ५५ लाख रुपये खर्चून ही स्मारके उभारली जाणार असून, या कामाचे भूमिपूजन काल, १५ जानेवारीला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजी नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड, धर्मवीर आखाड्याच अध्यक्ष मृत्‍यूंजय गायकवाड, नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, समितीचे कार्याध्यक्ष सुभाष मानकर, सुरेश चौधरी, लखन गाडेक, रामदास चौथनकर, गजेंद्र दांदडे, श्रीकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

आमदार म्‍हणतात, मी तुमचा बाप...
एक आमदार सर्वधर्मीयांच्या भावना जोपासण्याचे काम करतो. अशावेळी त्‍याला ताकद देण्याऐवजी विरोध होत आहे. मला त्‍यांच्या सहकार्याची गरज नाही. मात्र विरोध करू नका. विरोध करायचा प्रयत्न कराल तर मी तुमचा बाप आहे... तुम्हाला पुरून उरेल, असे यावेळी आमदार गायकवाड यांनी विरोधकांना सुनावले.