विजय राजस्थानात ; पण बुलडाण्यासह अर्ध्या हिंदुस्थानात तिरंग्या गुलालाची उधळण! वासनिक झाले खासदार! समर्थकांनी लावले फटाके: अंतर्गत विरोधकांना लागले फटाके !!

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जन्म भूमी नागपूर,  मोठा नेता करणारा बुलडाणा जिल्हा, दोनेक  दशक कर्मभूमी, पक्ष संघटनेला वाहून घेतल्याने दिल्ली सध्याचे रणांगण, प्रभारामुळे अर्ध्याधिक हिंदुस्थानात तयार झालेले चाहत्यांचे नेटवर्क असा साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुकुल वासनिकांचा राजकीय प्रवास. सुमारे चार दशकांच्या या चढ उताराच्या राजकीय वाटचालीत आज त्यांनी वरिष्ठ सभागृहात  प्रवेशापासून ते काही पावलेच दूर आहेत. पण ते राज्यसभा खासदार झाले आहे.

कमालीचा  राजकीय संयम,  निष्ठेवरून उडालेला संशय कल्लोळ, त्यांनतर निष्ठेच्या अग्निपरीक्षेत मेरिट मध्ये उत्तीर्ण झाल्यावर मिळालेली राज्यसभेची उमेदवारी आणि आज  तब्बल ८ वर्षानंतर मिळालेली खासदारकी ! वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या विजयाचा जल्लोष केवळ जयपूरच नव्हे तर हजारो किलोमीटर अंतरावरील जिल्हे बुलडाणा, राजधानी दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश, केरळ आदी विविध राज्यात साजरा झाला.

तेथील आकाश रात्रीनंतरही लाल भासत असेल, कारण गुलालाची उधळणच तेवढी झालेली! बुलडाण्यातील जय स्तंभ चौकात काँग्रेसच्या  फटाक्यांची दीर्घ काळानंतर झालेली आतिषबाजी अभूतपूर्व ठरावी. यावेळी संजय राठोड, ॲड विजय सावळे,   दीपक रिंढे, विनोद बेंडवाल, मोईन काझी, शैलेश खेडेकर, सुनील पनपालिया, ऍड कुरेशी आदींचे चेहरे आनंदाने फुललेले अन डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हेच चित्र होते.
 
राजकारण बदलणारा विजय

 केवळ संघटनात्मक पद म्हणजे पुरेसे नाही, वाघ पिंजऱ्यात अडकलेला असला तर कालचे  कारटे सुद्धा काड्या टोचतात, आपणच मोठे केलेले  'छोटे जीव'  राजकीय छळ करतात याचा  कटू अनुभव  वासनिकांनी दिल्ली ते गल्ली( बुलडाणा, नागपूर) मध्ये घेतलाय! पण आता ते ६ वर्षासाठी खासदार झाल्याने अन दिल्ली दरबारचे विश्वासू ठरल्याने आता चित्र पूर्ण बदलणार आहे. आता राजधानीतच काय बुलडाणा काँग्रेस मध्येही त्यांचा एकतर्फी वचक, दरारा राहणार हे उघड. त्यामुळे वासनिक संपले अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना या निकालाने  जबरदस्त चपराक दिली. म्हणून १० जून २०२२ ही तारीख वासनिकांसाठी सर्वात अविसमरणीय तारीख ठरणार नव्हे ठरली हे निर्विवाद.