उद्धव ठाकरेंनी बुलडाणा लोकसभेत माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी! खासदार प्रतापराव जाधवांचे खुले आव्हान

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघात माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान खा. प्रतापराव जाधव यांनी दिले. बुलडाणा येथे आज, २८ नोव्हेंबरला पत्रकारांशी बोलताना खा. जाधव यांनी हे विधान केले.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची चिखली येथे सभा झाली होती,त्या सभेत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी खा. जाधवांवर टीका केली होती. जुने चेहरे फसवे निघाले असे उद्घव ठाकरे म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या मदतीशिवाय निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान त्यांनी बंड करणाऱ्या आमदार ,खासदारांना दिले होते. दरम्यान आज, खा. जाधवांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे आहोत.

विचारांशी गद्दारी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला उभे राहून निवडून येऊन दाखवावे असे आव्हान खा. जाधवांनी दिले.  संजय राऊत ने शिवसेना संपविण्याची शरद पवारांकडून सुपारी घेतली आहे,शरद पवारांकडून संजय राऊत शाबासकी मिळवणारच असेही खा. जाधव म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या चिखलीच्या मेळाव्याला आलेले बहुतांश लोक इतर जिल्ह्यातले होते, अमरावती, अकोला, औरंगाबाद, जालना , जळगाव जिल्ह्यातून लोक आले होते. जिल्ह्यातील ४ ते ५ हजाराच्या वर लोक सभेला गेले नाहीत असेही खा. जाधव म्हणाले.