सत्तेत असतांना आमदार संजय रायमुलकरांवर उपोषणाला बसण्याची वेळ! रस्ते कामासाठी निधी मिळविण्यासाठी मेहकरात बसले उपोषणाला
आमदार संजय रायमुलकर यांनी याआधी अनेकदा या कामांसाठी पाठपुरावा केला. संबधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला मात्र मागणीला यश मिळत नसल्याचे पाहत त्यांनी थेट उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मेहकर मतदारसंघात येणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांना निधी मिळावा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत.
जनुना - शेलगाव देशमुख या रस्त्यासाठी ९० लाख, माळेगाव - मारोतीपेठ या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख, भोसा - माळेगाव या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख, राजगड - विश्र्वीसाठी ७० लाख, चींचाळा जोडरत्यासाठी ६० लाख, जनुना जोडरस्त्यासाठी ७० लाख व भोसा- मेळजानोरी या रस्त्यासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार संजय रायमुलकर यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पडावी यांच्याकडे केली आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान राज्यात शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळविण्यासाठी उपोषणाला बसावे लागत असल्याने राजकीय वर्तुळात या उपोषणाची चर्चा आहे.