हे तर, उशिरा सुचलेलं शहाणपण ! राज्यपालांच्या पदमुक्तीवर तुपकर काय म्हणाले? वाचा...

 
Tupkar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा स्वतःच व्यक्त केल्याची बातमी धडकत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांना 'उशिरा सुचलेलं हे शहाणपण' असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचे नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे. यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर बोलताना म्हणाले की,कोश्यारी स्वतःला कार्यमुक्त करीत असल्याची माहिती जर खरी असेल तर ती आनंदाची बाब आहे.

आतापर्यंत अनेक राज्यपाल लाभले परंतु त्यांचे वाद किंवा राज्यात अस्थिरता निर्माण झाली नाही.कोश्यारी यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्याने जन आक्रोश निर्माण होऊन अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान अनेकांच्या जिव्हारी लागले. ते स्वतःहून कार्यमुक्त होत असेल तर कोश्यारी यांनाही उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. राज्यपाल हे पद जबाबदारीचे आहे. या जबाबदारीच्या पदावर जबाबदारीने वागावे लागते. राज्यपालांनी कमी बोलायचे असते आणि जास्त काम करायचे असते. राज्यपाल पदाची गरिमा सांभाळता यायला हवी.येणाऱ्या माणसाने ती सांभाळावी अशी अपेक्षाही रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली.