वाळूमाफीयांच्या पायाखालची वाळू सरकणार!आ.संजय गायकवाड यांनी लावली लक्षवेधी;कोण आहे तो महसूल अधिकारी? तीन वर्षापासून लाखो ब्रास वाळूचे उत्खनन

 
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या अनेक वर्षापासून वाळू उत्खनन सुरू आहे. परिणामी पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. वाळू माफीयांना विरोध  केला तर, सर्व सामान्य असो की अधिकारी, अंगावर गाड्या घालून चिरडून टाकतात. मात्र आमदार गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार येथील वाळू उत्खननाचा प्रश्न रेटला. दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासित केले आहे.

आ. संजय गायकवाड यांनी आज २६ रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील अवैध रेती उपसासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली.या विषयावर बोलताना आ. गायकवाड म्हणाले की, तत्कालीन कमिश्नर यांनी चौकशी समिती गठित केली होती परंतु  नदीपात्रातून देऊळगाव राजा, सिंदखेडराजा या खडकपूर्ण पात्रामध्ये लीलाव झालेल्या घाटात शासनाच्या नियमाचे उल्लंघन झालेले आहे. अशा प्रकारची टिप्पणी दिल्यानंतर सुद्धा कमिशनर यांनी त्यावर कारवाई केली नाही. नायब तहसीलदार देऊळगाव राजा यांचा अवैध उत्खननाबाबत अहवालात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले होते की मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये अवैध उत्खनन  झालेले आहे.परंतु त्या ठिकाणचा नायब तहसीलदार वाळू माफियाशी संबंधित असल्यामुळे या सर्व गोष्टी घडवून आणत आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई होऊ शकली नाही. सुलतानपूर टाकरखेड भागिले येथील दोन शेतकऱ्यांनी त्या रेती माफीयांना विरोध केल्यामुळे त्यांना चिरडून मारले गेले. या दोन शेतकऱ्यांना चिरडून मारल्यानंतर सुद्धा त्या रेतीमाफीयांचे अवैध  उत्खनन तेथून थांबलेलं नाही. तसेच संबंधितावर अजून कारवाई सुद्धा झालेली नाही. या बाबतीमध्ये स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या,आंदोलन केले, परंतु तेथील पोलिसांनी सुद्धा त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही.ही घटना झाल्यानंतर सुद्धा एका वृद्ध शेतकऱ्याला रेती माफियांनी ५०० फूट फरफटत नेऊन चिरडून टाकलं, तरीसुद्धा त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही. असेही गायकवाड म्हणाले. त्यांनी विधानसभेमध्ये सॅटॅलाइटने काढलेले रेती उत्खननासंदर्भात सर्व फोटो संबंधित मंत्री महोदयांना दाखवले, तसेच लोणार तालुक्यामध्ये सुद्धा गैरमार्गाने वाळू उत्खनन होऊन सुद्धा कारवाई होऊ शकत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला.

कोण आहे हा नायब तहसीलदार?

सिंदखेड राजा, देऊळगाव राजा परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रात तीन वर्षापासून लाखो ब्रास वाळूचे उत्खनन होत आहे. शासनाला महसूलच्या रूपाने कोट्यावधी रुपयांचा चुना लागत आहे. तहसील विभागाकडून देऊळगाव राजा ते नागपूर असे पासेस कसे काय देण्यात येतात? नायब तहसीलदार राडे हे सर्व करीत असून त्यावर कारवाई केव्हा होईल? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

 संजय गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, वाळू उत्खनन संदर्भातील  मुद्दे हे खरे आहेत, या सर्व प्रकरणाची निश्चितपणे सखोल चौकशी करण्याचे अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त यांना आदेश देण्यात येत आहे.यामध्ये जो दोषी असेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.