राजकीय धामधुमीत भावी जिल्हा परिषद सदस्यांची धडकन वाढवणारी बातमी आज येणार..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असतांनाच भावी जिल्हा परिषद सदस्यांची धडकन वाढवणारी अंतिम प्रभाग रचना आज, २७ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह आधी प्रसिद्ध झालेल्या रचनेंवर आक्षेप घेणाऱ्यांचे लक्ष याकडे लागून आहे.

नवीन प्रभागरचनेत जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ६० वरून ६८ तर पंचायत समिती गणांची संख्या १२० वर १३६ इतकी झाली आहे. प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर ५१ हरकती दाखल झाल्या होत्या. १७ जून रोजी अमरावती येथे आयुक्तांच्या दालनात यावर सुनावणी झाली होती. सुनावणीवेळी हरकती घेणारे जवळपास २५ जण अनुपस्थित होते . त्यामुळे ३५ हरकतींवर सुनावणी घेण्यात आली होती. आता या हरकतींवर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावरच समोर येणार आहे. तालुकास्तरावर या रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
 
सगळ्यांचे लक्ष तिकडे असल्याने तयारीवर परिणाम
 

दरम्यान राज्यात सध्या शिवसेनेने बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे गटात समाविष्ट झाले आहेत. याचा नेमका निर्णय काय लागेल हे अस्पष्ट आहे.त्यामुळे महाविकास आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार या राजकीय भूकंपाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या तयारीवर परिणाम होत आहे.