भाऊंच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये वादळ! व्यक्तीनिष्ट कार्यकर्ते म्हणतात "मंजूर नही"; पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणतात हा तर भाऊंचा त्यागमय निर्णय अभिमानास्पद! याला म्हणतात पक्षशिस्त..!

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. भाऊंच्या राजीनाम्यावरून सध्या जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र असून एक गट व्यक्तिनिष्ठ तर दुसरा गट पक्षनिष्ट असा आहे. भाऊंच्या राजीनामा आम्हाला मंजूर नाही, भाऊशिवाय आम्हाला दुसरा अध्यक्ष  मंजूर नाही असे भाऊंवर प्रेम असलेल्या व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे तर आधी काँगेस नंतर व्यक्ती अशी विचारधारा असलेल्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी भाऊंच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. पदाला चिकटून राहण्याच्या काळात भाऊंनी पक्षशिस्त दाखवून पदाचा राजीनामा दिल्याचे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.

मे महिन्यात राजस्थानातील उदयपूर येथे काँग्रसचे अखिल भारतीय स्तरावरील चिंतन शिबिर पार पडले. त्या शिबिरात एका व्यक्तीला एकच पद व ५ वर्षांपेक्षा अधिक काळ एका व्यक्तीने पदावर राहू नये असा ठराव पास केला. ( अर्थात याला गांधी परिवार अपवाद आहे बरका..) त्यानंतर १ आणि २ जून रोजी शिर्डी येथे प्रदेश काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर पार पडले. या शिबिराच्या दरम्यान राहुल बोंद्रे यांनी नाना पटोले यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवला. जिल्हाध्यक्ष पदाची राहुल बोंद्रे यांची ही दुसरी टर्म होती. जिल्हाध्यक्ष होऊन ५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने नव्या नियमाप्रमाणे आपण राजीनामा दिल्याचे राहुल बोंद्रे यांनी सांगितले असेल तरी कार्यकर्ते मात्र अजूनही हा धक्का सहन करायला तयार नाहीत. व्यक्तीनिष्ट कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ओन्ली भाऊ, दुसरे कुणीच नको, आमचे जिल्हाध्यक्ष तुम्हीच अशा पोस्ट टाकल्या आहेत.

 दुसऱ्या बाजूला पक्षनिष्ठा जपणाऱ्या आणि काँग्रेस विचाराला प्राधान्य देणाऱ्या गटाने मात्र राहुल बोंद्रे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाऊंनी पक्षशिस्तीला शिरोधार्य  मानले आहे  वर्षानुवर्षे पाच पाच पदांना चिकटून बसण्याच्या व "सबकछ मुझे चाहिए" अशा जमान्यात हा त्यागमय निर्णय अभिमानास्पद असल्याची पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

राहुल भाऊ  तुम्ही नाही तर आम्ही कुणीही नाही.                                                                                                                                                                                                                              दरम्यान सोशल मीडियावर व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांनी' राहुल भाऊ तुम्ही नाही तर आम्ही कुणीही नाही" अशा पोस्ट टाकल्याने वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राहुल बोंद्रे यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील काही पदाधिकारी सुद्धा त्यांच्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे बोलल्या जात आहे. विशेषतः चिखली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देण्याची तयारी तर करीत नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे..