तर आमच्यात माजलेल्या सांडाची मस्ती उतरविण्याची ताकद! माझे कार्यकर्ते तंगड तोडतील! आमदार संजय गायकवाडांनी भरला दम; कुणाला ते वाचा...!
Updated: Aug 13, 2022, 13:10 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या आक्रमक आणि बिनधास्त वक्त्यव्यांनी नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचे एक आक्रमक विधान चर्चेत आले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी थेट धमकी वजा इशारा दिलाय. आमच्या मेंढपाळ बांधवांच्या अंगाला हात लावला तर माझे कार्यकर्ते तंगड तोडतील.. माज उतरविण्याची ताकद आमच्यात आहे असे विधान आमदार गायकवाडांनी केलेय.
काल, १२ ऑगस्टला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढपाळ बांधवांनी मेंढरासह मोर्चा काढला होता. या मोर्चाला संबोधित करीत आ. गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. वनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळ बांधवांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत.
काही मेंढपाळ बांधवांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहेत असे आ. गायकवाड म्हणाले. मेंढ्या चारण्यासाठी चराई जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे वनविभागाने चराई जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार गायकवाड यांचे चांगलेच आक्रमक रूप पाहायला मिळाले. वन अधिकाऱ्यांना जास्तच माज आला असेल तर अशा माजलेल्या सांडाचा मस्ती उतरविण्याची ताकद आमच्यात आहे असे आ. गायकवाड यावेळी म्हणाले.