जिल्ह्यातील शिवसैनिक कुणाच्या पाठीशी? आमदार संजय गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात आज खासदार जाधव घेणार जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक..!
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे याआधीच स्पष्ट केले असेल तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज, २७ जून रोजी बुलडाणा येथे जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच शिवसैनिक नेमके कुणाबरोबर हे समोर येणार आहे.
जिल्ह्यातील दोन्ही आमदार खासदार प्रतापराव जाधव यांचे "खास" आहेत. मात्र असे असले तरी आपल्याला न विचारता आमदार शिंदे गटात गेल्याचे खासदार जाधवांनी याआधी सांगितले होते. याशिवाय दोन्ही आमदारांचे मनपरिवर्तन करण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदार जाधव यांच्यावर सोपविली होती.
मात्र अद्यापपर्यंत तरी खासदार जाधवांना आमदारांची मनधरणी करण्यात यश आले नाही. खा. जाधव आणि जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत दोघेही या बंडानंतर मुंबईवरून परतले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आज जिल्ह्यातील शिवसैनकांची बैठक बुलडाणा शहरातील गर्दे हॉल मध्ये पार पडणार आहेत. विशेष म्हणजे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांच्या बालेकिल्ल्यात ही बैठक होणार असल्याने या बैठकीकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या नजरा लागून आहेत.