SUNDAY SPECIAL! 'मिशन बुलडाणा' : तब्बल ३ दशकांनंतर भाजपा उतरणार रणांगणात! एकमेव विजयाचा रेकॉर्ड मोडणार काय?..वाचा आधीच्या निवडणुकीत भाजपने किती मिळविली मते..!

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  निवडणूक रणनीती मध्ये निपुणच नव्हे तर इतर पक्षांच्या तुलनेत २ पाऊले( वर्ष) पुढे असणाऱ्या भाजपाने सन २०२४ च्या रणसंग्राम साठी 'मिशन ४५' या टार्गेट वर आत्ता पासूनच काम सुरू केले आहे, पक्षाच्या रडारवर बुलडाणा लोकसभा मतदारसंघ देखील असून दोन वर्षांनी होऊ घातलेल्या रणसंग्रामात तब्बल ३ दशकानंतर  भाजपाची एन्ट्री होणार आहे. या लढतीद्वारे  पक्ष आपला आजवरचा दुसरा विजय नोंदविणार काय? हा प्रश्न    मिशन च्या निमित्ताने पुढे आलाय!

स्थापनेनंतर भाजपने सन १९८४ मध्ये प्रथमतः निवडणूक लढविली. अनुसूचित जाती करिता राखीव असलेल्या मतदारसंघातून पक्षाने माजी खासदार दौलत गुणाजी गवई यांना उमेदवारी दिली.  त्यांना ७३ हजार ३६ मतांवर  समाधान मानावे लागले. नुकतेच राज्यसभा सदस्य झालेले मुकुल वासनिक( १ लाख ६६ हजार २८१मते)  त्या लढतीत विजयी अन पहिल्यांदा खासदार ठरले. मात्र भाजपने  हार मानली नाही. सन १९८९ च्या लढतीत भाजपाने सुखदेव नंदाजी काळे यांना उमेदवारी दिली. त्या लढतीत  मतदारात वासनिकांप्रति असलेली  नाराजी, कांग्रेस नेत्यांची छुपी कारस्थाने यामुळे वासनिकांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.

"बंद करा बापलेकांचे चाळे, निवडणूक आणा सुखदेव नंदाजी काळे" ही घोषणा त्यावेळी प्रचंड गाजली होती. वासनिक यांना  २ लाख ३१ हजार ९९० मते मिळाली होती.  तर २ लाख ९७ हजार ९०४  मते मिळवीत काळे हे जायंट किलर ठरले असतांनाच मातृतीर्थात पाहिल्यादाच कमळ फुलले! मात्र १९९१ च्या संग्रामात वासनिक ( २ लाख १३ हजार ४९५ मते घेत)  सहानुभूती च्या लाटेवर का होईना  विजयी ठरले. भाजपचे  उमेदवार  पी .जी. गवई ( १ लाख ७६हजार ४०४  मते) हे पराभूत झाले. त्यानंतर तडजोडीत पक्षाने हा मतदारसंघ शिवसेनेला बहाल केला. तो २०१९  पर्यंत वाघांकडेच  राहिला 
 
३३ वर्षानंतर...

 या पार्श्वभूमीवर २४ च्या निवडणुकीत बुलडाणा काबीज करण्याच्या जिद्द घेऊन उतरणारी भाजपा  तब्बल ३३ वर्षानंतर बुलडाणा लोकसभेच्या लढाईत उतरणार आहे. ३ निवडणुका , २ पराजय अन एकमेव विजय असा ट्रॅक रेकॉर्ड असणारा हा अग्रणी पक्ष बाजी मारीत दुसरा विजय साकारणार काय? याचे उत्तर काळाच्या उदरात दडले असून २ वर्षांनीच मिळणार आहे...