पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल; वाचा खासदार प्रतापराव जाधव, आमदार सौ. श्वेताताई महाले, रविकांत तुपकर, हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे निवडणूक निकाल आज, १० मार्चला जाहीर झाले. पंजाबवगळता उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असे चित्र निर्माण झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपने मिळवलेला हा विजय भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. या निवडणूक निकालाबद्दल जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया बुलडाणा लाइव्हने जाणून घेतल्या... महाराष्ट्रात १०० टक्के सत्तांतर होणार असून, भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्‍त केला अाहे, तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. त्या निकालांचा राज्यावर परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र; महाराष्ट्राची जनता हुशार -खासदार प्रतापराव जाधव
देशात मोदींचा करिश्मा कायम असला तरी उत्तरप्रदेशात भाजपच्या जागा आधीपेक्षा कमी झाल्याने मोदी आणि योगींचा करिश्मा कमी झाला एवढे नक्की. या राज्यांत शिवसेनेची फारशी ताकद नव्हती. काही जागा उत्तर प्रदेशात आणि काही जागा गोव्यात आम्ही लढवल्या. यश मिळाले नसले तरी शिवसेनेचा विस्तार त्यानिमित्ताने होत आहे. तिकडच्या निवडणुकांचा परिणाम जिल्ह्यातल्या व राज्यातल्या निवडणुकांवर होणार नाही. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे. महाराष्ट्राची जनता हुशार आहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका झाल्या तर त्याचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने राहतील, असे खासदार प्रतापराव जाधव म्‍हणाले.

ये तो सिर्फ झांकी है -आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुका लढल्या. पाचपैकी ४ राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा नारा भाजपने कृतीतून सार्थ ठरवल्यामुळे भाजपला हे यश मिळत आहे. भाजपने राबविलेल्या लोककल्याणकारी कामांची ही पोचपावती आहे. ये तो सिर्फ झांकी है. महाराष्ट्रात १०० टक्के सत्तांतर होणार असून, भाजप सत्ता स्थापन करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जी काँग्रेस पंजाब, उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये निर्णायक ठरत होती. ती आता कुठेच दिसत नाही. काँग्रेस फक्त आता सोशल मीडियापुरती मर्यादित आहे, असा टोला आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी लगावला आहे.

लोकांना बदल हवा होता -माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन. लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पंजाबमध्ये लोकांना बदल हवा होता. या आधी सुद्धा अकाली दलाची सत्ता असताना त्यांना सत्ता गमवावी लागली. यावेळी पुन्हा सत्तांतर झाले. पराभवातून पुन्हा उठून कामाला लागू. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या पराभवाची समीक्षा केली जाईल, असे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्‍हणाले.

पंजाबचा निकाल देशाला दिशा दाखवणारा -स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर
फारसे अस्तित्व नसताना, पैसा नसताना, यंत्रणा नसताना पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मिळवलेला विजय अभिनंदनास पात्र आहे. पंजाबचा निकाल देशाला दिशा दाखवणारा आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सक्षम पर्याय देशातील जनता शोधत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने तो पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. इतर ४ राज्यांत भाजपने विजय मिळवला आहे. त्यावरून मोदींचा करिश्मा अजूनही कायम असल्याचे दिसते. ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी जाती- धर्माचे राजकारण सोडून शेतकऱ्यांच्या, कष्टकरी जनतेच्या हिताचे राजकारण करून मिळालेल्या संधीचे सोने करावे एवढी आमची अपेक्षा आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्‍हटले आहे.