जिल्ह्यातल्या २७९ गावांत थंडीत पेटणार राजकारण! आज दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना होणार चिन्हांचे वाटप; प्रचारालाही होणार सुरुवात

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू असून आज,७ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. आज दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप देखील होणार आहे.

या निवडणूकित थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे खरे चित्र आज स्पष्ट होईल. मैदानात कोण कोण आहे याचे खरे चित्र आज जनतेला कळणार आहे. १८ डिसेंबरला मतदान होणार असल्याने आता उद्यापासून ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.  

गावाचा बॉस आपल्या पक्षाचा असावा यासाठी राजकीय नेतेसुद्धा आपली ताकद लावणार आहेत. तसे पाहता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नसले तरी चांगल्या उमेदवाराला आपल्या पक्षाचा शिक्का लावायला राजकीय पुढारी मागे पुढे पाहत नाहीत. विशेषतः निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर निवडणूक आलेले उमेदवार आपल्या पक्षाचे आहेत असा दावा राजकीय पक्षांकडून होत असतो. तूर्तास पुढचे १० दिवस ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच पेटणार असल्याची चिन्हे आहेत.