जिल्ह्यातल्या २७९ गावांमध्ये कडाक्याच्या थंडीत राजकारण पेटले! आजपासून अर्ज भरायला सुरुवात; थेट जनतेतून निवडणार सरपंच!
विशेष म्हणजे या निवडणुकीत पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष ही पद्धत सुरू करण्यात आली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच तो निर्णय रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष ही पद्धत सुरू करण्यात आली. त्यामुळे आता निवडणुका होत असलेल्या २७९ गावांत थेट जनतेतून सरपंच निवडल्या जाणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम..
आज, २८ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. ५ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. दरम्यान त्याच दिवशी दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. १८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होईल. २० डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती?
दरम्यान जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ५० ग्रामपंचायती मेहकर तालुक्यातील आहेत. लोणार ३९,सिंदखेड राजा ३०, चिखली २८, संग्रामपूर २१, देऊळगाव राजा १९, जळगाव जामोद १९, खामगाव १६, नांदुरा १३, बुलडाणा १२, मोताळा ११, मलकापूर ११ तर शेगाव तालुक्यातील गावांमध्ये निवडणुका होत आहेत.