पंकजा मुंडेना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याने मुंडे समर्थक खवळले! देऊळगावराजात टरबूज फोडले

 
देऊळगावराजा( राजेश कोल्हे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारल्याने मुंडे समर्थक प्रचंड खवळले आहेत. भाजपने आयात उमेदवारांना तिकिटे दिली मात्र ज्या मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भाजप तळागाळात पोहचवला त्या मुंडे साहेबांच्या कन्या , माजी मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारले असा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे. पुंकेजा मुंडेना तिकीट नाकारल्याने संतप्त मुंडे समर्थकांनी आज देऊळगावराजा येथे टरबूज फोडून निषेध केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांत पंकजा मुंडे यांचे नसल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत. काल, परवा एका मुंडे समर्थकाने भर पत्रकार परिषदेत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पंकजा मुंडे समर्थकांनी आघाडी उघडली आहे. पंकजा मुंडे या बहुजन नेत्या आहेत.

त्यामुळेच भाजपा बहुजन नेतृत्वाला  पुढे येऊ देत नाही असा आरोप देऊळगाव राजा येथे कार्यकर्त्यांनी केला. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती मधून भाजपाला हद्दपार करून भाजपच्या बहुजन विरोधी धोरणाचा बदला घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टरबुज फोडून भाजपचा निषेध करण्यात आला. ॲड सचिन आंधळे, बबलू जायभाये, विलास नागरे, निलेश वनवे, अमोल काकड, शुभम खार्डे , विनोद मुंडे , पवन आघाव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.