आता बुलडाण्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर! शिवसेना नेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड ( त्यांच्या भाषेत उठाव) केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यात दररोज आणखी काही नेत्यांची सुद्धा भर पडत आहे. बलडाण्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सुध्दा आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. कालच त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेचे १८ पैकी १२ खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केल्या जात आहेत. त्यातच वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची लोकसभा प्रतोद पदावरून हकालपट्टी शिवसेनेने केले आहे. त्यामुळे त्याही शिंदे गटात सामील झाल्यात जमा आहेत. त्यातच आता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीसुद्धा राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी खिंडार पडले आहे.

अडचणीच्या काळात पक्ष आणि पक्षप्रमुख पाठीशी उभे राहिले नसल्याची खंत आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उपचार घेत असलेल्या अडसूळ यांची भेट घेतली होती. अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे आधीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत.