नवनियुक्त सरपंचांचा स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरवर सत्कार! रविकांत तुपकर म्हणाले,राजकारण विसरून गावविकासासाठी एकत्र या :
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बुलडाणा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे रविकांत तुपकरांनी हृदयसत्कार केला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी हा सत्कार सोहळा अराजकीय व कौटुंबिक स्वरुपाचा असल्याचे सांगून गावाच्या विकासासाठी नूतन सरपंच व सदस्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले. निकाल लागल्यानंतर नूतन सरपंच व सदस्यांनी चिखली मार्गावरील रविकांत तुपकर यांच्या स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर येथे सदिच्छा भेट दिली. केवळ शेतकरी हाच पक्ष, त्यांच्या समस्या निवारण करणे हाच धर्म आणि शेतकरी चळवळ हेच जीवनकार्य मानणाऱ्या रविकांत तुपकर यांनी विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके उपस्थित होते.
या पदाधिकाऱ्यांचा केला सन्मान
दत्तपूर-आनंदवाडीचे सरपंच संदीप संतोष कांबळे, गिरडा सरपंच सुनीताबाई सुरेश गायकवाड, सवच्या सरपंच इंदुबाई विलास शेळके, येळगाव सरपंच दादाराव श्रीराम लवकर, मौंढाळा सरपंच सविताताई तुळशीराम काळे, चिखली तालुक्यातील सोनेवाडी सरपंच ज्ञानेश्वर वसंता गोफणे यांच्यासह सदस्यांचा तसेच सावळा-सुंदरखेडचे सदस्य संगीता भापचंद चंदन, कल्पना विजय खरे, मंगलसिंग विजयसिंग राजपूत, अफजलपूर-दत्तपूरचे सदस्य आकाश परशराम माळोदे, शीतल समाधान माळोदे, जीवन दाभाडे, संजीवनी कैलास फुलझाडे, सोनेवाडीचे सदस्य सुधाकर तायडे, गणेश जाधव, परमेश्वर पवार यांचा सत्कार करण्यात आला. रविकांत तुपकर यांनी विजयी उमेदवारांना गावच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या.
युवकांचा विजय, सकारात्मक राजकारणाची नांदी
या निवडणुकीत युवा वर्गाने मोठा विजय मिळवला. प्रस्थापित पुढाऱ्यांना धक्का देत अनेक युवा तरुण विजयी झाल्याचे तुपकर म्हणाले. ही सकारात्मक राजकारणाची नांदी असल्याचे ते म्हणाले. स्वाभिमानीच्या बुलडाणा ते दिल्लीपर्यंत गाजलेल्या व यशस्वी ठरलेल्या एल्गार आंदोलनात 'किरकोळ' अपवाद वगळता सर्वपक्षीय शेतकरी, कार्यकर्त्यांनी तन मन धनाने सहकार्य केले. त्याच अराजकीय भावनेने केलेले अभिनंदन म्हणजे आजचा सत्कार सोहळा असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. यामध्ये 'स्वाभिमानी'चे दत्तपूर-आनंदवाडीचे सरपंच संदीप कांबळे यांच्या विजयाचे शिल्पकार आकाश माळोदे व गिरडा येथील अजय गायकवाड यांनी प्रस्थापित पुढाऱ्यांना झुकवत विजय मिळवला आहे. त्यांचे तुपकर यांनी विशेष कौतुक केले.