काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले नरेंद्र खेडेकर म्हणाले जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत! गद्दारांचे हाल होतील..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. जिल्ह्यातले दोन्ही आमदार आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राज्यभरात शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात येत आहे. आज, २५ जून रोजी काँग्रेस मधून शिवसेनेत घरवापसी केलेल्या नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी चिखली येथे बंडखोर आमदारांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

नरेंद्र खेडेकर हे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आहेत.  शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये गेल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली होती.दरम्यान आज चिखली येथे शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला नरेंद्र खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील दोन्ही आमदार शिंदे गटात समाविष्ट झाले तरी त्याचा जिल्ह्यातील कडवट शिवसैनिकांवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसैनिक हे उद्धव साहेबांसोबतच आहेत.

ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली त्यांचे हाल होतात हा इतिहास आहे. माजी मंत्री राजेंद्र गोडे यांनी शिवसेना सोडल्यावर कसे हाल झाले हे सगळ्यांना माहीत आहे असे नरेंद्र खेडेकर म्हणाले. यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली.  बैठकीला तालुका प्रमुख कपिल खेडेकर, नंदू कऱ्हाडे, संतोष भुतेकर, दत्ता सुसर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.