'एक व्यक्ति' मुळे अनेकांची स्पर्धेतून माघार! राहुल बोंद्रेंचा उत्तराधिकारी कोण? कार्यकर्त्यांतील उत्सुकता शिगेला
शिर्षकामधील 'एक व्यक्ति' म्हणजे कोण आणि त्यामुळे अनेकांनी माघार का घेतली ? असा प्रश्न वाचकांना पडणे स्वाभाविक आहे. एखादा नेता नसून चिंतन शिबीर मध्ये घेण्यात आलेला एक व्यक्ति एक पद चा निर्णय होय ! सुमारे सव्वावर्षांपूर्वी अध्यक्ष बदलणार अशी हवा असताना जुन्या नेत्यांनी बोंद्रे यांनाच कायम ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी निर्माण झालेल्या शर्यतीत ऍड विजय सावळे अखेरीस उपविजेते राहिले! काही वासनिक समर्थकांनी नेहमीच्या 'रोख ' -ठोक स्टाईल ने ऐनवेळी कासम गवळी यांचे नाव रेटले तर काहींनी न्यूट्रल राहण्याचा घातकी निर्णय घेतला. वासनिकांच्याच भरवश्यावर मोठे झालेल्या परंतु त्यांचं किती दिवस ऐकायचं या पवित्र्यात असलेल्या काही प्रस्थापित पुढाऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, जयश्री शेळके, यांचे नाव पुढे करीत अखेर बोंद्रे यांच्या गळ्यात माळ पाडून घेतली(च)! विखुरलेल्या वासनिक निष्ठावानांची बोटचेपी भूमिका 'जी -६ ' गटाच्या पथ्यावर पडली!
मागील स्पर्धेचा हा तपशील सांगायचे कारण म्हणजे त्याला जेमतेम सव्वाएक वर्ष झालय! त्यामुळे काँग्रेसच्या सारीपाटावर नेते तेच, त्यांची जिल्हा काँग्रेसवर आपले वर्चस्व स्थापित करण्याची इच्छा तीच, डावपेच तेच, वासनिक गोटातील नेते तसेच गाफील व नेत्याचे हित न जोपासण्याची त्यांची वृत्ती तीच! मात्र फरक एकच म्हणजे तो ' एक व्यक्ति' ( या धोरणाचा) चा. त्यामुळे आता बोंद्रे हे स्पर्धेत नसल्याने गेम बदलला आहे. यातच काँग्रेसच्या कडssक धोरणामुळे अनेक इच्छुक स्वतः हुन बाहेर पडले आहे . यामुळे मागचे रनर्स अप विजय सावळे यावेळी आरपारची जिद्द व अधिक ताकदीने भिडले आहे. त्यांना भविष्यातील अन्य पदाचा सोस नसल्याने 'एक व्यक्ती' चा तर नाही पण 'अनेक व्यक्तींचा' त्रास होऊ शकतो. त्यांच्या शिवाय प्रकाश पाटील, जयश्री शेळके, ज्ञानेश्वर पाटील, रामविजय बुरुंगले ही नावे चर्चेत आहेत. मात्र नजीकच्या काळात या सर्वांना निवडणूक लढवायच्या असल्याने व त्यांच्याकडे अगोदरच पद असल्याने ते कितपत आग्रही आहे हे सांगने कठीण आहे. याशिवाय संतोष आंबेकर, मीनल आंबेकर, स्वाती चाफेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
धक्कातंत्र मधील फोलपणा
आता काही काँग्रेस भक्त म्हणतात की पक्षश्रेष्ठी अर्थात प्रामुख्याने मा. खा. ( माजी तर आहेच, चाहते माननीय खासदार ही वाचू शकतात) मुकुल वासनिक हे जिल्हाध्यक्ष निवडीत धक्कातंत्र चा वापर करून अनपेक्षित नाव देऊ शकतात. आता देशभरात धक्के खाऊनही पक्ष अन नेते धक्कातंत्र, गटबाजी, शह प्रतिशह, कुटील डावपेच, खेकडा वृत्ती मधेच धन्यता मानत असतील तर देव सुध्दा काँग्रेसचा वाली नाही हे शेंबड्या पोरालाबी कळतं! वासनिकांसारखा प्रभावी नेता असताना जर कालच्या पोरासमोर त्यांची चालत नसेल अन एकमताने अध्यक्ष निवड होत नसेल तर अश्या नेतृत्वाचा फायदा काय? नेहरू युवा केंद्रा ची पार्श्वभूमी असलेले विजय अंभोरे जर यशस्वी अध्यक्ष ठरू शकतात तर विजय सावळे, आंबेकर दाम्पत्य ,पाटील, बुरुंगले आदी मंडळींना काँग्रेस व राजकारणाचा काहीच गंध नाही का ? हा सवाल पुढे येतो. आता काड्या केल्या तर त्या करणाऱ्यांना नजीकच्या काळातील निवडणुकीत त्याचा फटका बसणार हे उघड आहे. त्यामुळे त्यांनीही पक्ष अडचणीत आहे, पक्षच नाही राहिला तर ते देखील 'जिवंत' राहणार नाही, याचे भान ठेवावे. यामुळे मागील वेळी बाळबोध राजकारण करणाऱ्या आपल्या समर्थकामुळे आणि जी -६ च्या डावपेचांमुळे किंचित माघार घेणाऱ्या वासनिकांनी आता रोखठोक निंर्णय घेण्याची गरज आहे. अर्थात राज्यसभा, विधान परिषद निवडणूक झाल्यावरच अध्यक्षाच्या निवडीकडे ते आणि नेते वळतील हे उघड आहे.