महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही! महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या सन्मान यात्रेत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा घणाघात;
तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने म्हणाले महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही! शिरपूर येथून यात्रेला उत्साहात प्रारंभ
महाराष्ट्रात सध्या भाजपच्या काही नेत्यांकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्यात येत आहे. हा अपमान जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी डॉ. शिंगणे यांनी केला. यावेळी डॉ. शिंगणे यांनी दत्तात्रय लहाने यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचेही कौतुक केले. दत्तात्रय लहाने बोलतांना म्हणाले की, महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या नेत्यांना घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही.
अशा नेत्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी संसदेने कायदा करावा ,यासाठीची जनजागृती या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे दत्तात्रय लहाने म्हणाले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना घटनात्मक पदावरून दूर करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे. त्यासाठी यात्राकाळात जनसामान्यांच्या स्वाक्ष्यऱ्या संकलित करण्यात येणार आहेत. त्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असल्याचे श्री.लहाने यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी शिरपूर गावातील महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या जयजयकारांच्या घोषणांनी यावेळी शिरपूर नगरी दुमदुमली होती. शिरपूर नंतर यात्रा साखळी गावाकडे मार्गस्थ झाली.