खासदार प्रतापराव जाधवांचा व्हिडिओ व्हायरल!; शिरखुरमा खातांना सांगितली "अंदर की बात" !
२९ एप्रिल रोजी डोणगावच्या सरपंचदाची निवडणूक पार पडली होती. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९ तर शिवसेनेकडे ८ सदस्य होते. त्यामुळे शिवसेनेचा सरपंच होणार नाही हे निश्चित होते. मात्र गुप्त मतदान झालेल्या या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या एका सदस्याने फितुरी केली अन् शिवसेनेच्या उमेदवार रेखा पांडव या सरपंच झाल्या.
मात्र गुप्त मतदानामुळे ही फितुरी केली कुणी हे उघडकीस आले नव्हते. त्यामुळे फितूर झाले तरी कोण अशी चर्चा डोणगावच्या राजकीय वर्तुळात रंगत होती. या निवडणुकीत आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे चरण आखाडे यांच्या सरपंचपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्या बदल्यात गाव तुमच्याकडे अन् जिल्हा परिषद आमच्याकडे अशी बोली काँग्रेस आणि राष्ट्रवादीत झाली होती असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मात्र खासदार प्रतापराव जाधवांनी गोड शिरखुरमा खातांना काँग्रेस अन् राष्ट्रवादीत तिखट आग लावल्याचे आता बोलल्या जात होते. त्यांना आखाडे नको होता म्हणून शैलेश सावजी यांनी ४ लाख रुपयांत माणूस दिला असे वक्तव्य खासदारांनी केले. खासदारांच्या या विधानाने डोणगावच्या स्थानिक राजकारणात मात्र "अवकाळी" वादळ घोंगवण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते शैलेश सावजींनी विठ्ठलावर हात ठेवून विधान करण्याचे आव्हान आता खासदार प्रतापराव जाधव स्वीकारतील का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या प्रकरणी खासदार प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.
पहा व्हायरल झालेला व्हिडिओ https://youtu.be/jHQsp55FMX0