खासदार प्रतापराव जाधव यांचे टीकास्‍त्र... भाजप ग्रामीण जनतेला मूर्ख बनवतोय!; हिंदू- मुस्लिम दुफळीसाठी "काश्मीर फाईल्स'

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपाचे लोक बुद्धीजीवी आहेत. कावेबाज आहेत. देशातील ग्रामीण जनतेला ते मूर्ख बनविण्याचे काम करीत आहेत. हिंदू- मुस्लिम समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. वाशिम जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानासाठी दौऱ्यावर असताना मंगरूळ नाथ येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला आज, २४ मार्चला रात्री ते बोलत होते.

5788

भाजपला शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. तुम्ही कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणारे..? देशातल्या हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या नावाने मतदान करायला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविले असे प्रमोद महाजन म्हणाले होते. शिवसेनेला हिंदुत्व विचारणाऱ्या लोकांच्या थोबाडावर प्रमोद महाजन यांचे ते युट्यूबवरील भाषण फेकून मारा, असे खासदार जाधव म्हणाले. भाजपला राममंदिराचे श्रेय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. संसदेत कायदा करून राममंदिर बांधा. आम्ही तुम्हाला मतदान करू, असे शिवसेनेचे खासदार म्हणाले होते.

मात्र भाजपने कायदा न करता न्यायालयाच्या निकालाची वाट पाहिली. बाबरी ढाचा पाडला तेव्हा शिवसेनेने ती जबाबदारी स्वीकारली तेव्हा भाजपवाले कुठे होते? असेही खासदार जाधव म्हणाले. देशात आज काश्मीर फाईल्स चित्रपटाचा उदोउदो भाजपवाले करीत आहेत. मात्र जेव्हा काश्मिरात हिंदूंच्या कत्तली झाल्या तेव्हा सरकार कुणाचे होते हे दाखवलं नाही. त्यावेळी व्ही. पी. सिंग पंतप्रधान होते आणि भाजपच्या कोट्यातून गेलेले जगनमोहन राज्यपाल होते. तेव्हा काश्मीरमध्ये मिल्ट्री तैनात करून सर्व काही सुरळीत करता आलं असतं. मात्र भाजपने तसे केले नाही. कारण या मुद्याचा त्यांना राजकारणासाठी उपयोग करायचा होता.

भाजपचे हिंदुत्व हे पळपुटे हिंदुत्व आहे. शिवसेना मुस्लिमांचा द्वेष करीत नाहीत. शिवसेनेच्या मंत्रिमंडळात मुस्लिम मंत्री आहेत. मात्र सध्या शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपचे बुद्धिवादी लोक करीत आहेत. वेगवेगळे फंडे वापरून सामान्य लोकांना शिवसेनेपासून तोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहेत. मात्र भाजपचे प्रयत्न सफल होणार नाहीत. भाजपच्या केंद्राच्या सगळ्या योजना फसव्या आहेत, असेही खासदार जाधव म्हणाले. येणारा काळ शिवसेनेचा आहे. पदे घ्या मात्र काम करा. बाळासाहेबांचे विचार समजून घ्या, असे आवाहन सुद्धा खासदार जाधव यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.