आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर अन् मुख्यमंत्र्यांचा आमदारांवर विश्वास नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना नावाने ओळखतही नाहीत..! भाजपच्या विजयावर काय म्हणाल्या आमदार श्वेताताई महाले पाटील वाचा..!
Updated: Jun 21, 2022, 11:44 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या महाविकास आघाडीचा गोंधळ सुरू आहे. राज्याच्या नेतृत्वावर भाजपच काय तर महाविकास आघाडीचे आमदार सुद्धा प्रचंड नाराज आहेत. भाजपने विधानपरिषद निवडणुकीत मिळवलेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल रणनीतीचा विजय आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील आणि आमदारांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत अशी प्रतिक्रिया चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी काल, २० जूनच्या रात्री उशिरा भाजपच्या विजयानंतर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना दिली.
आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी भाजपच्या पोलींग एजंट म्हणून कालच्या निवडणूक प्रक्रियेत काम सांभाळले. भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाल्यानंतर रात्री उशिरा बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील २८८ सोडा शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा नावाने ओळखत नाहीत. ते आमदारांना भेटत नाही. आमदारांचे फोन उचलत नाही.
उद्धव ठाकरे यांचा आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्यावर नाराज आहेत. याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेत व सर्वपक्षीय आमदारांत प्रचंड लोकप्रिय आहेत असे श्वेताताई म्हणाल्या. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल म्हणजे राज्यातील परिवर्तनाची नांदी असल्याचेही श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या.