अडीच वर्षात एकनाथ शिंदेंचे दोन्ही आमदारांशी राहिले स्नेहसंबंध! रायमूलकरांच्या लेकीच्या लग्न समारंभासाठी हेलिकॉप्टरने आले होते !! ' तिसऱ्या संजय' नेही मध्यंतरी दिली होती जिल्ह्याला भेट?

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेना विरुद्ध बंडाचा झेंडा बुलंद करणारे ना . एकनाथ शिंदे यांचे गत अडीच वर्षात जिल्ह्यातील दोन्ही सेना आमदारांशी उत्तम अगदी घरगुती संबंध राहिले . हा घरोबा त्यांनी उत्तमरीत्या सांभाळला असल्याने शिंदे नॉट रीचेबल झाल्याबरोबरच दोन्ही आमदारांचे फोन बंद झाले.  या दोघांची कालपासून जिल्ह्यासह राज्यात चर्चा सुरू असतानाच मध्यंतरी ' तिसऱ्या  संजय' ने जिल्ह्याला गुपचूप भेट दिल्याची माहिती सामोरे आली आहे. योगायोगाने हे तिन्ही संजय आता सेनेच्या ' नाथा' सोबत वेगळ्या  प्रवासावर निघाल्याचे मजेदार चित्र आहे. 

सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर जे स्थान  नारायण राणे यांचे होते ते स्थान   एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. यामुळे त्यांचे राज्यातील सेना आमदारांसोबत उत्तम संबंध जुळले ! नियमित फोनद्वारे संपर्क,   मंत्रालयातच नव्हे मुंबईत देखील काही अडचण असली तर ती दूर करणारा नेता असा त्यांचा लौकिक निर्माण झाला. राजकारण पलीकडचे संबंध त्यांनी जोपासले. याला जिल्ह्यातील २ आमदार देखील अपवाद नव्हते.

आ. संजय  रायमूलकर यांच्या कन्येच्या  दीडेक महिन्यांपूर्वी झालेल्या  लग्नासाठी एकनाथ शिंदे  हेलिकॉप्टर ने मेहकरात दाखल झाले होते याचे स्मरण यानिमित्त आज झाले. यामुळे "सुरत स्वारीत'  या दोघांचा समावेश असल्याचे  काल, सकाळीच स्पष्ट झाले होते. दरम्यान दिग्रसचे  आमदार तथा माजी वनमंत्री संजय राठोड काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याला गुपचूप भेट देऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानपरिषद निवडणूक नंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे म्हणून पक्षात वजन असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे  सिफारीश वजा रदबदली करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केली होती असे समजते.