चिखली तालुक्यातील भरोसा गावाला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मोठे गिफ्ट! सव्वा दोन कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण! म्हणाले, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हेच माझे घर!

 
shingne
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हेच माझे घर आहे, त्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विकासकामांमध्ये सिंदखेडराजा मतदार संघाला सहाजिकच झुकते माप दिले. मात्र ते करत असताना जिल्ह्यातील इतर गावांवरही अन्याय होऊ दिला नाही. आवश्यक तेथे निधी आणि शासन स्तरावर विकास कामांसाठी सतत पाठपुरावा सुरूच ठेवल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भरोसा येथे केले.

gfff

चिखली तालुक्यातील भरोसा येथे ४ सप्टेंबर रोजी २ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच संगीता गणेश थुट्टे या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये  एकनाथ पाटील थुट्टे, गजानन वायाळ, दीपक म्हस्के, मनोज खेडेकर, डॉ. प्रकाश शिंगणे, बाळासाहेब काळे, राम खेडेकर, सुनील खेडेकर, भिकाजी खेडेकर, डॉ. विकास मिसाळ, कृष्णा मिसाळ, सुरेश भुतेकर, दीपक पुंगळे, मनोज भुतेकर, राजू जावळे, शेखर बोंद्रे, राजू भगत, नारायण चित्रोळे, अनंता गाडेकर, मधुकर वायाळ, गजानन परिहार, सचिन खेडेकर, अरुण पवार, अमोल सुर्वे, तानाजी चिकने, अमोल भुतेकर, सतीश भुतेकर, गजानन इंगळे, सत्तार पटेल, दिलीप शितोळे,भागवत सुरूशे, भिकन भुतेकर, विनायक साप्ते, दत्तू गावडे, अक्षय सुरूशे, सागर पडघान, गोपीनाथ सुरुशे उपस्थित होते. 

पुढे बोलताना आ. डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, भरोसा हे गाव शेतकऱ्यांच्या विविध विषयावर आंदोलन करण्यासाठी शेतकरी चळवळीचे केंद्र असून स्व. शरद जोशींच्या विचारावर प्रेम करणारे गाव आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यांना स्वतः पिकवलेल्या मालाचे भाव स्वतःला ठरविण्याचे अधिकार मिळतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे उद्गार काढत स्व. शरद जोशींना त्यांनी अभिवादन केले. शरद जोशी परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढले. शेतकऱ्यांना सन्मानाचे दिवस यायचे असेल तर त्याने पिकवलेला शेतमालाचे भाव ठरवण्याचा अधिकार त्याला मिळायला पाहिजे. देशातील शेतकरी सोडला तर सर्वच उद्योजकाना उत्पादित केलेल्या वस्तूचा स्वतः भाव ठरवण्याचा अधिकार आहे. पण शेतकऱ्यांकडून मात्र तो हिरावून घेण्यात आला आहे. याला जबाबदार राजकीय मंडळी असल्याची खंत देखील आ. डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केली.

 विकास निधी व विकास कामावर बोलत असताना सिंदखेडराजा मतदार संघावर बोलताना भावुक होत म्हणाले की, सिंदखेड राजा मतदार संघ हे माझे घर असून या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचे सदस्य असल्याचे भावनिक उद्गार डॉ. शिंगणे यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रस्ताविकामध्ये अंकुश थुट्टे यांनी गावामध्ये झालेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तसेच विविध समस्यांची देखील मांडणी केली. यावेळी गजानन वायाळ व एकनाथ पाटील थुट्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खेडेकर यांनी तर आभार प्रदर्शन भागवत थुट्टे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.