डॉ.राजेंद्र शिंगणे झाले माजी मंत्री! कोण होईल जिल्ह्याचे नवे पालकमंत्री? "या" कारणामुळे "ही" तीन नावे चर्चेत..!
जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत तर एकनाथ शिंदे गटात जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार सामील झाले आहेत. त्यामुळे फडणवीस - शिंदे सरकारमध्ये जिल्ह्यातील ७ पैकी ५ आमदार सहभागी असतील हे आता नक्की आहे. या पाच पैकी किती जणांना मंत्रीपद मिळते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मंत्रिमंडळ तयार करीत असताना सगळ्या जिल्ह्यांना अन् सगळ्या नेत्यांना सांभाळण्याची कसरत देवेंद्र फडणवीस यांना करावी लागणार आहे. या धामधुमीत जिल्ह्यातील "या" नेत्यांना लालदिवा मिळणारच अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून आहे.
श्वेताताई महाले
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील जिजाऊंची कर्तुत्ववान लेक असा नावलौकिक चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी कमावला आहे. पहिल्यांदाच आमदार झाल्या असल्या तरी आपल्या कणखर बाण्याने महिला आमदार म्हणून त्यांनी राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमदार होण्याआधी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष स्मरणात राहण्यासारखा आहे. अधिकाऱ्यांवरील त्यांची पकड, लोकसंघटन, लोकांचे प्रश्न सोडविण्याची हातोटी याशिवाय मंत्री म्हणून आवश्यक असलेले सर्वच गुण त्यांच्यात आहेत . सगळ्यात महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या अंत्यत विश्वसनीय गटातील आहेत. त्यामुळे मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याची लेक म्हणून आमदार श्र्वेताताई नामदार श्र्वेताताई बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. संजय कुटे
जळगाव जामोदचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.संजय कुटे आजी मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मागील कार्यकाळात अखेरच्या दोन वर्षात त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली होते. त्याचवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. राज्याचे कामगार कल्याण मंत्री म्हणून त्यांनी कामगारांच्या कल्याणाच्या अनेक योजना लागू केल्या ज्याचा लाभ आज महाराष्ट्रातील कोट्यावधी कामगारांना मिळत आहे. डॉ .संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटासोबत समन्वय साधण्याची जबाबदारीच फडणवीस यांनी कुटे यांच्यावर सोपविली होती. त्यासाठी कुटे सुरत आणि गुवाहाटी वारी करून परतले आहेत. ही बाब ते देवेंद्र फडणवीस यांच्या किती जवळचे आहेत हे सांगण्यास पुरेशी आहे. त्यामुळे डॉ. संजय कुटे पुन्हा एकदा नामदार होण्याची चिन्हे आहेत.
संजय रायमुलकर
मेहकरचे सलग तिसऱ्यांदा झालेले आमदार संजय रायमुलकर यांचे नावही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच त्यांचे नाव चर्चेत होते मात्र ऐनवेळी नाव मागे पडल्याने ते नाराज होते. गेल्या अडीच वर्षात सत्तेत असताना सुद्धा त्यांच्यावर मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली होती. विशेष म्हणजे ते उपोषण सुद्धा मुख्यमंत्री नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने सुटले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते पहिल्या दिवसापासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे संजय रायमुलकर यांना शिंदे गटाच्या कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने पहिली पसंती रायमुलकर यांना असल्याचे कळते..मात्र असे असले तरी एका जिल्ह्यात तीन मंत्रीपदे देताना फडणवीस यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.