फैसला ऑन दी स्पॉट... नव्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना करत होते परेशान; मग आ. श्वेताताई महालेंनी महावितरण कार्यालय गाठल्यावर वाचा काय झाले...
अमडापूर, इसोलीसह परिसरातील शेतकरी वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. काही शेतकऱ्यांचे अर्ज तर तीन-चार वर्षांपासून धुळ खात आहेत. वीज जोडणीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता. आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांच्या या अडवणुकीची माहिती प्राप्त होताच काल महावितरणचे कार्यालय गाठले. त्यांचा आक्रमकपणा पाहून अधिकारी अक्षरशः बिथरले होते.
अधिकारी श्री. जायभाये यांच्यासमोर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. अमडापूरचे अधिकारी श्री. शर्मा यांना खडसावले. त्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना वीज जोडण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी भाजपाचे प्रशांत पाखरे, राम जाधव, शाहेद पटेल, प्रसाद देशमुख, भारत शेळके, सरपंच सुनील शेळके, बबनराव राऊत, कृष्णा देशमुख, राम देशमुख, प्रवीण खंडेलवाल, नंदू जुमडे, जय भोले, श्याम जुमडे, अक्षय आदबाने, सोनू राऊत, गणेश आदबाले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागेवरच चुकीच्या बिलांत सुधारणा
वीज कंपनीने अनेक ग्राहकांना चुकीची, अव्वाच्या सव्वा बिले दिली आहेत. अमडापूरच्या अनेक ग्राहकांनी तशा तक्रारी केल्या असता अवाजवी बिलांची जागेवरच दुरुस्ती करण्यात आली. वीज समस्यांसोबतच उंद्री व अमडापूरच्या उपकेंद्रासाठी वाढीव भार वहनासाठी प्रस्ताव तयार करणे, उंद्री व अमडापूर विभागातील शेतात राहणाऱ्या लोकांसाठी तसेच नवीन गावठाणातील मागणी असलेल्या नागरिकांना सिंगल फेज लाईन १ मार्चपर्यंत देण्याबाबत कार्यवाही करणे, करवंड, टाकरखेड, हेलगा, डासाळा उंद्री उपकेंद्राला जोडणे, बेलासरीत स्वतंत्र रोहित्र मंजूर करण्यासह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली.
अमडापूर उपकेंद्रावर तक्रार रजिस्टर ठेवा
अमडापूर उपकेंद्रावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी असून अमडापूर उपकेंद्रावर तक्रार रजिस्टर ठेवण्याची सूचना आ. सौ. महाले पाटील यांनी केली.