पोळ्याला खामगावात राडा! पोलिसांच्या कारवाई विरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज खामगाव बंद! आमदार फुंडकरांचा "तीन" पोलीस अधिकाऱ्यांवर रोख! म्हणाले त्यांना आधी बदला ते फक्त एसीत बसून...

 
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोळ्याच्या दिवशी खामगावात दोन गटात चांगलाच राडा झाला. खामगाव शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर पोळा भरलेला असताना क्षुल्लक कारणावरून दोन गटात दगडफेक आणि हाणामारी सुद्धा झाली. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गटाच्या ७६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. मात्र पोलीस या घटनेला हिंदू - मुस्लिम चे स्वरूप देऊन येणाऱ्या काळातील सण उत्सवांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार आकाश फुंडकरांनी केला आहे. काल, आकाश फुंडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खामगाव बंदची हाक देण्यात आली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.

पोळा सणासाठी हजारोंचा जमाव जमत असताना पोलिसांनी केवळ होमगार्डचा बंदोबस्त लावला होता. नीट बंदोबस्त झाला असता तर ही घटना घडली नसती.  जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे तीन अधिकारी एसीत बसून शहरातील सर्वसामान्य मुलांना आरोपींच्या पिंजऱ्यात टाकत असल्याचा आरोप आ. फुंडकरांनी यावेळी केला.

खामगावात गणेशोत्सव व इतर सण शांतताप्रिय वातावरणात  पार पाडण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी व तीन पोलिस अधिकाऱ्यांना शहराबाहेर पाठवावे अशी मागणी सुद्धा आ. फुंडकरांनी केली. पोळ्याला घडलेल्या घटनेच्या व पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज, २९ ऑगस्ट रोजी खामगावकरांनी बंद मध्ये उस्फूर्तपणे सहभागी होऊन पोलिसांच्या दडपशहीचा निषेध करावा असे आवाहन शहरातील गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.