पलटवार! मंत्र्यांची जात काढून राहुल बोंद्रेंनी केला संविधानाचा अपमान; पं. स. सभापती सौ. तायडे यांचा आरोप, आ. सौ. महालेंकडून जातीचे नव्हे विकासाचे राजकारण!!
काल, २ मार्चला माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्यावर विविध प्रकारचे जातीयवादी आरोप केले. कोणतीही व्यक्ती आमदार किंवा मंत्री म्हणून त्या पदाची शपथ घेताना भारतीय संविधानाबद्दल खरी निष्ठा व श्रद्धा बाळगणे, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखणे, कार्य निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडणे, सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निस्पृहपणे ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देण्याचा अंतर्भाव आहे. मंत्री हा सर्व जनतेचा असतो. त्यांना जातपात नसते. मंत्रीपद संवैधानिक पद आहे. ते कोणत्याही जाती- धर्माचे पद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाखविलेले काळे झेंडे हे नितीन राऊत या व्यक्तींना नसून राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून दाखविलेले असल्याने राहुल बोंद्रे यांना शेतकऱ्यांनी दाखविलेल्या काळ्या झेंड्यात जातच कशी दिसली? असा टोला सौ. तायडे आणि जाधव यांनी लगावला. राहुल बोंद्रे आणि त्यांच्यासोबतच्या तथाकथित नेत्यांनीही त्यांचीच री ओढून त्यांच्या हो ला हो म्हणण्यातच धन्यता मानली, असेही ते म्हणाले.
हा तर लोकशाही मार्ग...
सरकारविरुद्ध असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी व न्याय हक्क मागण्यांसाठी उपोषण, आंदोलन, धरणे, असहकार, सविनय कायदेभंग या लोकशाही मार्गासोबतच काळे झेंडे दाखविणे, खुर्चीला हार घालणे हे सुद्धा मार्ग आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस या गांधी आदर्शावर असलेल्या सिनेमा निघाल्यापासून खुर्चीला हार घालणे हा तर गांधी मार्ग सांगितला जात आहे. असे असताना माजी आमदार राहुल बोंद्रे व त्यांचे सहकारी हे सुद्धा गांधीवाद व मार्गाचा पुरस्कार करत असताना शेतकऱ्यांनी दाखविलेल्या निषेधाच्या काळ्या झेंड्यात राहुल बोंद्रे यांना जात व समाज दिसल्याने त्यांना या गोष्टीचे केवळ राजकारण करावयाचे असल्याचे सिद्ध होत असून या काँग्रेसी मंडळींना लोकशाही, संविधान, गांधी मार्ग हे केवळ बोलण्या व वापरण्यापुरतेच दिसून येते. जनतेची दिशाभूल करून स्वतःची पोळी भाजण्याची ही साधने असल्याचा घणाघाती प्रहारही सौ. सिंधूताई तायडे यांनी यावेळी केला आहे.
आमदार सौ. श्वेताताई महाले मनुवादी असत्या तर मी सभापती झाले नसते...
माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्वच्या सर्व तथाकथित नेत्यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले या एक महिला असतानाही त्यांच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप करून त्यांना महिलांचे वर्चस्व सहन होत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. महिलांना सन्मानाची व बरोबरीची वागणूक न देता महिला म्हणून त्यांना हिनवणे, त्यांना सार्वजनिक अपमान व अवमान होईल असे कृत्य त्यांनी केलेले आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले या मनुवादी असत्या तर माझ्यासारख्या अति मागास व दलित महिलेला त्यांनी सभापती बनविलेच नसते, असेही सौ. तायडे म्हणाले. माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नेहमीच जातीपातीची दुकानदारी करून पोळी भाजून घेतली आहे. त्यांच्या याच प्रवृत्तीमुळे मागील निवडणुकीत आमदार सौ. श्वेताताई महाले यांना मुस्लिम, दलित, व इतर सर्व सामान्य मतदारांनी मतदान करून निवडून दिले आहे. त्यांना मिळालेल्या मतांमध्ये दलित व मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यामुळेच काँग्रेसची परंपरागत वोट बँक आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्याकडे जात असल्यानेच माजी आमदार राहुल बोंद्रे त्यांना जातीयवादी ठरवून आंबेडकरी जनतेत संभ्रम निर्माण करून आपली दुकानदारी शाबीत ठेवू पाहत असल्याचा प्रहारदेखील त्यांनी यावेळी केला आहे.
आमदार सौ. श्वेताताई महालेंचे नेहमीच विकासाचे राजकारण
आमदार सौ. श्वेताताई महाले या सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहेत. त्यांना कोणताही राजकीय वारसा मिळालेला नाही. त्यांनी स्वकर्तृत्वाने राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अनेक पिढ्यांनी राजकारण केलेले आहे. राजकारणातूनच त्यांनी सत्ता व संपत्ती मिळविलेली आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या सारखी कोणताही राजकीय, आर्थिक वारसा नसताना एक सर्व सामान्य महिला एका प्रथितयश राजकारणातील व्यक्तीला टक्कर देते ही सलच खऱ्या अर्थाने राहुल बोंद्रे यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच ते आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्यावर नेहमीच आरोप करत आले आहेत. आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कधीच जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले आहे, असेही सौ. तायडे व श्री. जाधव म्हणाले.
गांधींचा दिल्लीत तर बोंद्रेंचा चिखलीत विकास
काँग्रेसने अनेक वर्षांपासून गरिबी हटावचा नारा दिलेला आहे. पण गरिबी हटली नाही तर गरीब हटविले गेले आणि अनेक वर्षांपासून राजकारण करणाऱ्यांनी स्वतःची तुंबडी भरून घेतली. वर्षानुवर्षे दलित, मागास व मुस्लिम मतदारांना काँग्रेसने केवळ वापरून घेतले. त्यांचा विकास होऊ दिला नाही. काँग्रेसमध्ये केवळ दिल्लीत गांधींचा व चिखलीत बोंद्रेंचाच विकास झाल्याचा टोला देखील सौ. तायडे व जाधव यांनी हाणला.
वीज कापत असताना कोणताही काँग्रेसी नेता रस्त्यावर का उतरला नाही?
रब्बी हंगामात आघाडी सरकारच्या याच ऊर्जा मंत्री असलेल्या नितीन राऊत यांनी अतिशय निर्दयीपणे वीज कट करण्याचे आदेश दिले होते. चिखली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पिकांना पाण्याची आवश्यकता असताना लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची वीज कट केली. त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात घट झाली. पिके सुकली. तातडीने वीज जोडणी करा. नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करा या मागणीसाठी कोणताही काँग्रेसचा नेता रस्त्यावर उतरला नाही. काँग्रेसी नेते शेतकऱ्यांची वीज कट होताना घरात बसलेला असताना आमदार सौ. श्वेताताई महाले या रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढत होत्या. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे याच क्रूर सरकारने त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून हे सरकार व सरकारचे हस्तक तालिबानी असल्याने त्यांनी दाखवून दिले, असेही सौ. तायडे म्हणाल्या.
मंत्र्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांनो शेतकऱ्यांवर दाखल गुन्ह्याचे समर्थन काय?
रब्बी हंगामात वीज कट करून लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या सरकारात असणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी संवैधानिक व घटनादत्त लोकशाही अधिकाराचा वापर करून काळे झेंडे दाखविले. त्याबद्दल शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. खरंच काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांचा गुन्हे दाखल करण्या इतपत दोष होता का? शेतकरी हा बळीराजा आहे तसेच तो या लोकशाहीमधील सर्वात मोठा स्तंभ आहे. सरकारने शेतकऱ्यांवरील दाखल गुन्ह्याचा निषेध न करता मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, मंत्र्यांच्या जातीचा वापर करून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने मंत्र्यांची हुजरेगिरी करणाऱ्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांना माझा जाहीर प्रश्न आहे की शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे तुम्ही समर्थन करत आहात काय?, असेही सौ. तायडे म्हणाल्या.
पत्रकार परिषदेतील सर्व पुरुषांनी आमदार सौ. श्वेताताई महाले यांना धमकी दिली
मंत्र्यांच्या समर्थनार्थ माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या तथाकथित नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा साधा निषेध तर केला नाहीच उलट गुन्हे दाखल करणाऱ्यांचे समर्थन केले. मंत्र्यांच्या जातीच्या आड लपून राजकारण केले. एवढ्यावरच हे काँग्रेसी नेते थांबले नाही तर त्यांनी जाहीरपणे भविष्यात अशा घटना घडल्यास आमदार सौ. श्वेताताई महाले यांना उद्देशून त्या एक महिला असतानासुद्धा जशास तसे उत्तर देऊ, पाहून घेऊ, सोडणार नाही अशा जाहीर धमक्या दिल्याचे प्रसिद्धी माध्यमाव्दारे सर्व जगाने पाहिले. पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या सर्वच्या सर्व पुरुषांनी एका महिलेला जाहीर धमक्या दिल्या. या घटनेचा मी जाहीर निषेध करीत असून एका महिलेला दिलेल्या धमकीचे वेळ आल्यावर जोरदार उत्तर मिळेल, असे आव्हान देखील सौ. सिंधूताई तायडे यांनी दिले. या वेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप यंगड, माजी जिल्हाध्यक्ष यादवराव भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष राजू नाटेकर, विष्णू जोगदडे, विजय नकवाल, विजय खरे, सुरेश यंगड, सुशील शिनगारे, भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, सिध्देश्वर ठेंग, संतोष काळे, भीमराव अंभोरे, बबन गवई, अशोक हतागळे, किरण गुढेकर, नीलेश पूर्वे आदी उपस्थित होते.