कन्फ्युजन ही कन्फ्युजन है... सोल्युशन का पता नही..! प्रभागाच्या रचना प्रसिद्ध झाल्या तरी गोंधळ कायम!! कुणी म्हणे रद्द, कुणी म्हणे कायम...

शासनाच्या आदेशात स्पष्टता नसल्याने जिल्हा प्रशासनही वैतागले; मार्गदर्शक सूचना मागवणार
 
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ७ मार्चला विधानसभेत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी विधेयक मांडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेतले. विरोधक भाजपनेसुद्धा विधेयकाच्या बाजूने मदत केली. यासोबतच राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेली प्रभागरचना सुद्धा रद्द करण्यात येत असल्याचे विधानसभेत सांगण्यात आले. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्याची सत्ताधारी आणि विरोधकांची मानसिकता नसल्याने हा ठराव चर्चा न करता मंजूर करण्यात आला. मात्र तसे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला १० मार्चपर्यंत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे १० मार्चला जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या १२१ प्रभागांची प्रसिध्दी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. प्रभागरचना व प्रभागाच्या दर्शक नकाशावर १७ मार्चपर्यंत हरकती व  २२ मार्चला जिल्हाधिकारी सुनावणी करणार असा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला. त्यानंतर ११ मार्च रोजी राज्य शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये राज्य निवडणूक आयुक्तांनी महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतीच्या प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि हद्दी विनिर्दिष्ट करण्याची जी प्रक्रिया सुरू केली आहे ती रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले. त्यानंतर काल, १४ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानेसुद्धा जिल्हा प्रशासनाचा संभ्रम अधिकच वाढवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर सुद्धा यामुळे पेच निर्माण झाला आहे. पुढे करायचे काय? जो कार्यक्रम घोषित केलेला आहे त्याची अंमलबजावणी करायची की नाही, असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांसमोर सुद्धा निर्माण झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागविणार असल्याचे नगर प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने काल, १४ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात, प्रभाग रचना आता राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने करावयाची आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सुरू करण्यात आलेली प्रभाग रचनेची पुढील कारवाई ही राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी, असे लिहिले आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेली प्रक्रिया रद्द न करता यापुढील कारवाई राज्य शासनाच्या निर्देशानुसार करायची असाच अर्थ त्या पत्राचा निघत आहे.

याउलट राज्य शासनाने ११ मार्चला प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात प्रभाग रचना रद्द असा उल्लेख असल्याने राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या आदेशात परस्पर विसंगती असल्याचे नगर प्रशासन विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या नगर परिषद पातळीवर हरकती मागविण्याचे काम सुरू असेल तरी १७ मार्चपूर्वी नेमके खरे काय ते स्पष्ट निर्देश राज्य शासनाकडून मिळणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम येथील जिल्हाधिकारी सुद्धा राज्य शासनाकडे मार्गदर्शक सूचना मागवणार आहेत.

निवडणूक आयोगाला निवडणुकांचे काम करू द्यावे...
निवडणुकांच्या तारखा ठरविण्यासह प्रभाग रचना रद्द (?) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने निवडणुका निःपक्षपातीपणे होतील का, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. स्वायत्त असलेल्या राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार सरकारकडे आले तर  गोंधळ हा उडणारच. त्या त्या पक्षाचे सरकार आपल्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा घोषित करेल. त्यामुळे लोकशाहीला अर्थ उरणार नाही. त्‍यामुळे निवडणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप नकोच, अशी भावना अनेकांनी बुलडाणा लाइव्हजवळ बोलून दाखविली.