खासदार जाधवांना कॉन्फिडन्स! म्हणाले; २०२४ चा बुलडाण्याचा खासदार मीच! चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

 
बुलडाणा( बुलडाणा, लाइव्ह वृत्तसेवा): बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन मी गेल्या ३७ वर्षांपासून शिवसेनेत आहे आणि सध्याही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. भाजप आमचा मित्रपक्ष होता आणि आहे. तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार म्हणून निवडून येत असताना शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार होतो. त्यामुळे २०२४ चा बुलडाण्याचा पुढचा खासदार सुद्धा मीच राहील असे विधान खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे विधान केले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलडाण्याचा २०२४ चा खासदार भाजपचाच असे विधान केले होते. त्याला उत्तर देत असताना खासदार जाधवांनी त्यांची बाजू मांडली. आमच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचे खासदार जाधवांनी सांगितले. बावनकुळे नवीन अध्यक्ष झाले आहेत , कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ते तसे बोलले असतील असेही खासदार जाधव म्हणाले. मात्र २०२४ चा बुलडाण्याचा खासदार मीच असे सांगायला खासदार जाधव विसरले नाहीत.