शेतकऱ्यांसोबत गद्दारी करणाऱ्या कंपन्यांना सोडणार नाही! आमदार श्वेताताई महाले कंपन्यांच्या प्रतिनिधींना म्हणाल्या, ही धमकीच समजा!
जिल्ह्यात किती खते उपलब्ध आहेत याचा आढावा बैठकीच्या सुरुवातील आ.महाले यांनी घेतला. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी केला. यावर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील तर शेतकऱ्यांना लिंकीग ची जबरदस्ती कशाला असा सवाल श्वेताताईंनी उपस्थित केला. कृषी केंद्र चालकांना विचारल्यावर ते लिंकीग साठी कंपन्या दबाव आणत असल्याचे सांगतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कंपन्यांना पाठीशी घालू नये असे श्वेताताई म्हणाल्या.
जिल्हा कृषी विभाग, कृषी विषयक कंपन्या, कृषी केंद्र चालक यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचा आरोप यावेळी श्वेताताईंनी केला. येणाऱ्या काही दिवसांत शेतकरी मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जाणार आहे. आता यापुढे जर लिंकिंग होत असल्याचा प्रकार आमच्या कानावर आला तर कृषी केंद्र चालकासोबत कंपनीला सुद्धा दोषी धरल्या जाईल. त्यामुळे होणाऱ्या कारवाईला तुम्हाला समोर जावे लागेल.
कंपनी आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे लक्षात आल्यास अधिकाऱ्यांची सुद्धा गय केली जाणार नाही. त्यामुळे अन्नदात्याशी गद्दारी करू नका असे आवाहन आमदार श्वेताताईनी केले. शेतकऱ्यांची लूट थांबली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी, खते बियाणे व कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.