निकालाआधीच खासदार प्रतापराव जाधवांचा दावा; म्हणाले, जिल्ह्यातल्या २०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती आमच्याच येणार

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १८ डिसेंबरला  जिल्ह्यातल्या २५९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर आज, २० डिसेंबरला लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. दुपारपर्यंत कोण किती पाण्यात याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे तरी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी निकाला आधीच विजयाचा दावा केला आहे. जिल्ह्यातल्या २०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युती जिंकणार असल्याचा दावा खा.जाधवांनी केला आहे.

१८ डिसेंबरला पार पडलेल्या मतदानात ३लाख ७४ हजार१२५ मतदारांपैकी ३ लाख ३ हजार४९० जणांनी मतदान केले होते. आज लागणाऱ्या निकालातून २५१ सरपंच व १५४७ सदस्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत पक्ष नसला तरी निवडून आल्यानंतर मात्र राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून जिंकलेला उमेदवार आमच्याच पक्षाचा असा दावा केला जातो. मात्र खा.जाधवांनी निवडणुकांची घोषणा झाली तेव्हाच जिल्ह्यातल्या २०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती आम्हीच जिंकू असा दावा केला होता, आता निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना पुन्हा खासदार जाधव यांनी त्यांच्या दाव्याचा पूनरूच्चार केला आहे.