मोठी बातमी! काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राहुल बोंद्रेनीं दिला राजीनामा.!जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ! वाचा काय आहे कारण.. कोण होणार नवीन अध्यक्ष? "या" नावांची चर्चा...
मे महिन्यात उदयपूर येथे काँग्रसचे अखिल भारतीय चिंतन शिबिर झाले. या शिबिरात एकापेक्षा जास्त पद असलेल्या पदाधिकाऱ्यांना एक पद तसेच एक व्यक्ती ५ वर्षांपेक्षा जास्त काळ एका पदावर राहणार नाही असा नवीन नियम लागू करण्यात आला. राहुल बोंद्रे यांनी याधीच जिल्हाध्यक्ष पदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची त्यांची दुसरी टर्म सुरू होती.
मात्र संघटनेच्या शिस्तीचे पालन करून राहुल बोंद्रे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यापुढे जिल्हाध्यक्ष नसलो तरी काँग्रेसच्या संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. जिल्हाध्यक्ष असताना राहुल बोंद्रे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. काँग्रेसने संघटन मजबूत केला. मात्र आता बोंद्रे यांच्या राजीनाम्यामुळे नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
चर्चेतील नावे...
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत पहिले नाव आहे ते ॲड विजय सावळे यांचे. विद्यार्थीदशेपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या विजय सावळे यांना आतापर्यंत अनेक पदांनी हुलकावणी दिली. वेगवेगळ्या पक्षांनी त्यांना त्यांच्या गोटात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले मात्र श्री सावळे हे एकनिष्ठ राहिले. राहुल बोंद्रे यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा ॲड सावळे हेच जिल्हाध्यक्ष होतील असा कयास बांधला जात होता. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही.
त्यामुळे आता पुन्हा ॲड सावळे यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले संजय राठोड, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, मेहकेचे माजी नगराध्यक्ष कासिम गवळी यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र काँग्रेसमध्ये काहीही होऊ शकते, त्यामुळे चर्चेतील नावांव्यतिरिक्त वेगळेच नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी समोर आले तर कुणाला नवल वाटायला नको...!