BULDANA LIVE SPECIAL: बावनकुळे भाजपचे अध्यक्ष; आमदार संजय कुटेंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा! ऊर्जा की जलसंपदा ? समर्थकांसह जिल्हावासीयांना उत्सुकता..!

 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर राज्यमंत्री मंडळाचा पहिला टप्पा पार पडला आणि  खातेवाटप देखील झाले. यामुळे आता विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याची जिल्हावासीयांना आतुर प्रतीक्षा लागली असून यात जिल्ह्याला संधी मिळेल का आणि कोणते खाते मिळणार याबद्धल उत्सुकता निर्माण झाली आहे.

चाळीसएक दिवसानंतर नुकतेच मंत्रिमंडळ चा मर्यादित विस्तार झाला. मात्र यात बुलडाणा जिल्ह्यातील ५ पैकी एकाही आमदाराचा विचार झाला नाही. यामुळे जिल्ह्यात नाराजीचे सूर उमटले. सर्वाधिक संधी असलेले माजीमंत्री संजय कुटे हे भाजप प्रदेशाध्यक्ष होण्याच्या शक्यतेने   पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते अशी चर्चा आहे. मात्र आता चंद्रशेखर  बावनकुळे हे अध्यक्ष झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार कुटे यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. तसेच त्यांना पालकमंत्री पदाची देखील संधी आहे.

 एवढंच नव्हे तर त्यांना कोणते खाते मिळणार याबद्धल उत्सुकतावजा चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. उप मुख्यमंत्र्याकडे तब्बल ७ खाती आहेत. त्यातील ऊर्जा किंवा जल संपदा हे खाते त्यांना मिळू शकते. मागील मंत्रीमंडळात गिरीश महाजन  जलसंपदा  तर संजय कुटे हे कामगार मंत्री  होते. आता ते सुरेश खाडे यांना देण्यात आले आहे. यामुळे  सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या विस्तारात कुटे यांना संधी मिळणार काय याबद्धल ऑगस्ट मध्यावरच चर्चा सुरू झाली आहे.

रायमूलकरांचे काय..?

दरम्यान विस्तार- भाग २ मध्ये शिंदे गटाचे आमदार संजय कुटे यांची वर्णी लागणार काय हा देखील उत्सुकतेचा विषय ठरला आहे. ज्येष्ठ आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे रायमूलकर उघडपणे बोलत नसले तरी त्यांची लाल दिव्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्या लालदिव्याचा फैसला खा. प्रतापराव जाधव यांच्या हाती आहे. त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळात खा.जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाले तर काय? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.