BULDANA LIVE SPECIAL ! बंडखोरीच्या त्सुनामीच्या काळात अविचल निष्ठेचे 'एक्झिट' !! मूल्याधिष्ठित राजकारणाचे ठरले मूर्तिमंत उदाहरण..!

 
बुलडाणा( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुरोगामी महाराष्ट्राच्या मूल्याधिष्ठित आणि तत्ववादी राजकारणाची परंपरेतील एक राजकारणी  असलेल्या जनार्दन बोन्द्रे यांचे आज पुण्यभूमी नाशिक क्षेत्री  निधन झाले. ८० वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभलेल्या या नेत्याचा राजकीय मंचावरील वावर तत्व आणि जीवन मूल्ये यांची सांगड घालणारा होता. त्यामुळे ते समवयस्क नेते ते आजच्या केवळ ' मूल्य ' जाणणाऱ्या प्रोफेशनल राजकारणातील कार्यकर्त्यांसाठी देखील ते अखेरपर्यंत जनुभाऊच राहिले. ते कधीच 'साहेब ' झाले नाहीत हे त्यांच्या साधेपणातील मोठेपणच म्हणावे! ...

८० वर्षांच्या आयुष्यातील संध्याकाळ त्यांनी थेट स्वर्गातून अवतरलेल्या गोदेच्या ( गोदावरीच्या) सानिध्याने पुनीत झालेल्या नाशिक क्षेत्री घालविली. देहही तिथेच त्यागला.  पेशाने ( नगर पालिका)शिक्षक  असलेल्या जनुभाऊंना राजकारण व समाजकारणाची उपजतच आवड होती. बोन्द्रे या नावाचा काँग्रेस पक्षात आणि चिखली व जिल्ह्याच्या राजकारणात तेंव्हाही प्रभाव होता आणि आताही प्रभाव आहे. आणीबाणी नंतर  राजकारणात एकट्या पडलेल्या स्वर्गीय इंदिरा गांधींना उभारी देण्याचे काम १९७८ च्या निवडणुकीने दिले. त्यात बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भाचा सिंहाचा वाटा होता. 
 
या निष्ठेपायी त्यांना चिखलीतून उमेदवारी मिळाली अन मावळते आमदार भारत बोन्द्रे यांना पराभूत करून ते प्रथम विधानसभेत पोहोचले. बुलडाण्यात शिवाजीराव पाटील, मेहकरात सुबोध सावजी, सिंदखेडराजा मध्ये जे .के.खरात असा इंदिरा काँग्रेसचा त्या लढतीतील स्कोर राहिला. जनता पार्टीतर्फे लढणारे पांडुरंग फुंडकर, ( खामगाव) अर्जुनराव वानखडे( मलकापूर) व जलंब मध्ये शेकापचे तुळशीराम  ढोकने असा घाटाखालचा निकाल होता. जनुभाऊंना १९८० व १९८५ मध्ये उमेदवारी मिळाली पण कमालीचा साधेपणा अन् अर्थकारणापायी विजयाने त्यांना हुलकावणी दिली.

काँग्रेसचे दीर्घकाळ जिल्हाध्यक्ष आणि भूविकास बँकेचे अध्यक्ष त्यांनी सांभाळले( उपभोगले नाही) . काँग्रेस व दिवंगत बाळकृष्ण वासनिक आणि मुकुल वासनिक या नेत्यावरील त्यांची निष्ठा कायम राहिली. निधनापूर्वी काल खा. मुकुल वासनिकांशी व्हिडीओ कॉल द्वारे साधलेला संवाद राजकीय नेत्यांशी केलेला अखेरचा संवाद ठरला आणि आज त्यांनी तृप्त मनाने जगाचा निरोप घेतला! महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या खालच्या पातळीवरील आणि निष्ठेला पायदळी तुडवुन सूर असलेले राजकारण लक्षात घेतले तर जनुभाऊ खरंच ग्रेट होते असेच म्हणावे लागेल...