रूग्ण कल्याण समितीवर भाजप कार्यकर्त्यांची नेमणूक! खामगावतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत नाराजी..! भाजप - राष्ट्रवादीची छुपी युती असल्याची चर्चा!

 
खामगाव ( विनोद भोकरे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधे दररोज  शाब्दिक वार सुरू आहेत. भाजप नेते   राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्थात त्याचे कारणही तसेच आहे. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात रुग्णकल्याण  समितीवर राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून भाजपच्या शक्तीकेंद्र  प्रमुखाला संधी देण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली शरद युवा संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. ह्या यात्रेचे बुलडाणा जिल्ह्यात १३  जून रोजी आगमन झाले आहे. तर ही यात्रा राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात जाऊन  सर्वाशी संवाद साधून पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. त्यातच नगर परिषदेचे पडघम वाजू लागले आहे तर  आगामी नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खामगावात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या घडामोडी दरम्यान पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच  खामगांव येथील सामान्य रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीवर  एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  ही एक खेळी आहे की राष्ट्रवादी सोबत छुप्या युतीचे संकेत आहे ?  असा प्रश्नही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. खामगावात भाजप कार्यकर्त्याला दिलेली नियुक्ती याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. रुग्ण कल्याण समितीवर दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असते. यावर  राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नते माजी नगरसेवक नरेंद्र पूरोहित व भाजपा कार्यकर्ते सचिन पाठक यांची नियुक्ती  करण्यात आली. 

सचिन पाठक हे भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्याकडे खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ चे भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख पद आहे.  तसेच ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे सर्वश्रुत आहे. मग त्यांची नियुक्ती या पदावर कशी? असा प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत आहेत.  सचिन पाठक हे रा. काँ.चे खामगाव शहरातील एकमेव नगरसेवकांच्या कार्यालयात अनेक वेळा दिसून येतात. त्या ठिकाणी रा. काँ.चे जे वरिष्ठ पदाधिकारी येतात त्यांचे स्वागत करतांनाही दिसून येतात. याचा अर्थ त्यांनी भाजपाला रामराम तर ठोकलेला नाही ? पण तसेही दिसत नाही कारण नुकतीच एका वर्तमानपत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी सचिन पाठक यांना शुभेच्छा देणारी भली मोठी जाहिरात देवून पालकमत्र्यांचे आभार मानले आहे.

 या नियुक्ती बाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष टी. डी.अंभोरे , प्रदेश सरचिणीस प्रसेनजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायपुरे यांच्यासह अनेक नेत्यांना लेखी व तोंडी तक्रारी देवून सुद्धा जिल्यातील नेत्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. हाती सत्ता असताना निष्ठावंतांना डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठे  का करता असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय.  विशेष म्हणजे सचिन पाठक यांच्या नियुक्तीच्या तक्रारी झाल्याचे समजताच एका राष्ट्रवादीच्या नेत्याने सचिन पाठक यांचे जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांसोबत काढलेले जुने फोटो सचिन पाठक यांना जमा करून ठेवायचे सांगून सचिन पाठक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेते जो निर्णय घेत आहेत तो कदाचित पक्षाला घातक ठरू शकतो.  ही आगामी निवडणूकीच्या दृष्टीने खेळलेली एक चालही असू शकते.  मात्र यामुळे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते मात्र नाराज होत आहेत. या समितीवर दुसरा सदस्यही राष्ट्रवादीचाच असायला हवा अशी मानसिकता कार्यकर्त्यांची ची आहे. त्याच प्रमाणे बरेच वेळा भाजपा आणि रा. कॉ. यांची खामगांवात न.प. निवडणूकी करीता युती होणार असल्याच्या चर्चाही पसरत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडतात. त्याचाही खुलासा जेष्ठ नेत्यांनी करणे गरजेचे असून पक्षात उपऱ्यांना  कोणतेही स्थान न देता शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे, प्रसेनजित पाटील , जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी कार्याध्यक्ष टी .डी. अंभोरे यांना मानणाऱ्या व  राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनाच कोणत्याही समितीवर नियुक्ती करताना स्थान द्यावे अशी अपेक्षा  निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.