भाजपचा प्लॅन बुलडाणा लोकसभा! नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बुलडाण्यात! खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फिरणार?

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आज पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ४ वाजता ते बुलडाणा शहरात पोहचणार असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे. जुन्या अजीसपूर रोडवर असलेल्या गोडे नर्सिंग कॉलेज मध्ये ते लोकसभा क्षेत्र प्रवास योजनेची बैठक घेणार आहेत. या बैठकीला भाजपचे बुलडाणा लोकसभा प्रभारी खा. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार श्र्वेताताई महाले पाटील, आमदार संजय कुटे देखील उपस्थित राहणार आहेत. भाजप नेत्यांच्या डोक्यात मिशन बुलडाणा लोकसभा असल्याने विद्यमान खासदार जाधवांची धाकधूक वाढणार आहे. आपण भाजप - "शिंदे सेना" युतीचे लोकसभा उमेदवार राहू या खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फिरण्याची चिन्हे दिसत आहेत.

 जे मतदारसंघ सध्या भाजपकडे नाहीत अशा राज्यातील १६ मतदारसंघावर सध्या भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या केंद्रीय यंत्रणेकडून ही रणनीती ठरवण्यात आली आहे. या १६ मतदारसंघात बुलडाणा लोकसभेचा सुद्धा समावेश असल्याने भाजपने त्यादृष्टीने तयारीला सुरुवात देखील केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत तशा बैठकीसुद्धा झाल्या आहेत

. मात्र भाजप - शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार  प्रतापराव जाधव हे शिंदेगटात गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपणच भाजप शिंदे सेना- युतीचे उमेदवार राहू अशी आशा त्यांना आहे. मात्र आधीपासून तयारीला लागलेल्या भाजपचा प्लॅन वेगळाच असल्याने खा. जाधव यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही परिस्थितीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी करायचा असा चंग भाजप कार्यकर्त्यांनी  बांधला आहे.