८५ टक्के पदवीधर म्हणतात, जुनी पेन्शन, पदवीधरांच्या वाढत्या बेरोजगारीचा रणजित पाटलांना बसेल फटका! जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर धिरज लिंगाडेंना होणार फायदा?
ऑनलाईन आणि प्रत्यक्ष भेटी या दोन माध्यमातून बुलडाणा ,अकोला, वाशिम या तीन जिल्ह्यातील ४२०० पदवीधर मतदारांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली होती. जुनी पेन्शन , वाढती बेरोजगारी या मुद्द्यांचा रणजित पाटलांना फटका बसेल का असा प्रश्न पदवीधरांना विचारण्यात आला होता. त्यावर तब्बल ३५७० पदवीधरांनी रणजित पाटलांना या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचे मत व्यक्त केले तर ५४६ जणांनी फटका बसणार नसल्याचे सांगितले. ८४ पदवीधरांनी नेमके काय होईल हे सांगता येत नसल्याचे मत व्यक्त केले. रणजित पाटलांना जुनी पेन्शन आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर फटका बसणार असल्याचे सांगणाऱ्यांची टक्केवारी ८५ टक्के तर फटका बसणार नाही असे मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या १३ टक्के एवढी आहे, २ टक्के पदवीधरांना नेमकं काय होईल हे सांगता आले नाही.
फायदा कुणाला?
विद्यमान आमदारांबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा कुणाला होतोय हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र प्रचार कालावधीत महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांना विविध संस्था, संघटना यांचा मिळालेला भरघोस पाठिंबा. महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांची एकजूट यामुळे लिंगाडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. जुनी पेन्शन, नोकरभरती, शिक्षकांचे अनुदान, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे मुद्दे लिंगाडे यांच्या बाजूने प्रभावीपणे मांडण्यात आले. त्यामुळे प्रचारात घेतलेली आघाडी जर मतपेटीत परिवर्तित झाली तर लिंगाडे यांना विजयाचा गड दूर नाही एवढेच...!