जिल्ह्यातील ७ आमदार तातडीने मुंबईला रवाना! बॅगा घेऊन मुक्कामी येण्याचे पक्षादेश !!

 
बुलडाणा ( संजय मोहिते;बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यसभा पाठोपाठ सत्ताधारी महाआघाडी अन प्रबळ विरोधी पक्ष भाजपासाठी राजकीय प्रतिष्ठेची बाब ठरलेल्या विधानपरिषदेच्या  येत्या सोमवारच्या मुहूर्तावर होणाऱ्या महालढतीसाठी चारही पक्षांनी कमालीची दक्षता घेतली आहे. याचाच एक भाग व दगा फटका होऊ नये म्हणून सर्व पक्षांनी सर्व आमदारांना राजधानीत तातडीने व मुक्कामाच्या तयारीने पाचारण केले आहे. यापरिणामी जिल्हयातील सर्व पक्षाचे सातही आमदार राजधानीला आज रात्री रवाना होत आहे.  पक्षाने निर्धारित केलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये  हे नेते अगदी मतदान होई पर्यंत मुक्कामी राहतील अशी  विश्वसनीय माहिती आहे.

 राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने आघाडीला प्रामुख्याने सेनेला धोबीपछाड देत चौफेर बाजी मारली. यामुळे धास्ताविलेल्या आघाडीने यावेळी ' दूध का जला छाच भी फुंक कर पिता है' या धर्तीवर विधानपरिषदेसाठी कमालीची दक्षता बाळगली आहे. यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना दोननेक दिवसापूर्वीच मुंबईत येण्याचे आवतन दिलंय! बॅग भरून व दीर्घ मुक्कामाच्या तयारीने येण्याचे सांगण्यात आले. 

आज रात्री रवानगी

 दरम्यान जिल्ह्यातही 'बहुमत' असलेल्या भाजपचे  ३  आमदार संजय कुटे, आकाश फुंडकर व  श्वेताताई महाले पाटील  हे मुंबईकडे आज रात्री कूच करणार आहे. आमदार महाले यांनी जाण्यापूर्वी ही आपले कर्तव्य व शेतकरी निष्ठा सिद्ध करीत खत बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले. बैठकीनंतर त्या मुंबई साठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे आज रात्री मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार संजय रायमूलकर हे पंचायत राज समितीच्या सोलापूर दौऱ्यावर असून आज रात्री तेथूनच मुंबईला कूच करणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे अगोदरच फिल्डिंग मध्ये असून 'मार्गावरच' आहे.  काँग्रेसचे आमदार राजेश एकडे देखील उद्या सकाळी मुंबईत डेरे दाखल होतील. 
 
गुंता गुंतीची लढत

२० जूनला होणाऱ्या महासंग्रामच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरल्याने लढत अटळ ठरली. पूर्ण ताकद नसताना काँग्रेसने २ उमेदवार उतरविले. भाजप १०६, सेना ५५, राष्टवादी  ५३ आणि काँग्रेस ४४ असे बलाबल आहे. यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांचे वाटप आणि  अपक्ष व छोटे पक्ष यांच्या( नियती) वर लढती चे निकाल अवलंबून आहे. यामुळे ही लढत आणि निकाल वादळी ठरण्याची चिन्हे आहे. त्याचे साक्षीदार जिल्ह्यातील ७ आमदार ठरणार आहे..